413709

ऊस आंतरमशागत अवजारे व कृषीयंत्रे

ऊस आंतरमशागत अवजारे व कृषीयंत्रे 

खत पेरणी अवजार

सुधारित खत पेरणी अवजाराच्या साह्याने ऊस लागणीपूर्वी सरी पाडल्यानंतर सरीमध्ये खत पेरून दिले जाते. यामध्ये स्फुरद व पालाशयुक्त खते एकत्र मिसळून दिली जातात. या खतामध्ये युरिया मिसळू नये, कारण युरियाचा हवेशी जास्त वेळ संपर्क आला, तर युरिया ओलसर होतो व खत पेरणीमध्ये अडचण येते, खत जमिनीत व्यवस्थित पेरता येत नाही, सारख्या प्रमाणात पडत नाही. खत पेरणी अवजार बैलजोडीच्या साह्याने ओढले जाते. या अवजाराच्या साह्याने खत पेरणी केली असता खत जमिनीमध्ये सारख्या प्रमाणात पाच ते सात सें.मी. खोलीवर पडते, यामुळे ते मुळांच्या कार्यक्षेत्रात पडल्यामुळे पिकांना शोषण करणे सोईस्कर होते, त्यामुळे उसाची उगवण चांगली होते.

कृषिराज

या अवजाराला तीन लोखंडी फण असतात म्हणूनच या अवजाराचा उपयोग उसाला भर देणे व सरी-वरंबा फोडण्यासाठी केला जातो; तसेच रिजर जोडून उसाची बांधणीही करता येते. कृषिराज अवजारामधील मधला फण काढल्यास हे अवजार ऊस लागणीनंतर दीड ते दोन महिन्यांनी उसामधील आंतरमशागतीसाठी वापरता येते. मधला लोखंडी फण काढल्यामुळे कडेच्या दोन्ही फणांमध्ये ऊस येतो व फणांच्या साह्याने उसाला दोन्ही बाजूंनी थोड्या प्रमाणात भर लागते. याच वेळी शिफारशीत नत्र खताचा दुसरा हप्ता (40 टक्के नत्र) द्यावा. म्हणजे दिलेली खतमात्रा मातीआड केली जाते. नत्र खते मुळांच्या सान्निध्यात दिली गेल्यामुळे व उसाला भर मिळाल्याने फुटव्यांची वाढ जोमदार होते. फुटवे फुटण्याचे प्रमाण वाढते व उसाच्या बगलेतील तणांचा बंदोबस्त करता येतो.
या अवजाराच्या साह्याने एका दिवसात एक बैलजोडी दीड एकर क्षेत्रात आंतरमशागतीचे काम पूर्ण करते. याच अवजाराला तीनही फण जोडून ऊस लागणीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनी सरी-वरंबा फोडण्यासाठी उपयोग करतात. सरी-वरंबा फोडल्यामुळे जमीन सपाट व भुसभुशीत होते व उसाला भर दिली जाते. याला उसाची बाळबांधणी असे म्हणतात. या वेळी शिफारशीत नत्र खताचा तिसरा हप्ता (दहा टक्के नत्र) द्यावा म्हणजे दिलेली खतमात्रा मुळांच्या सान्निध्यात मातीआड केली जाते, यामुळे उसाची वाढ जोमदार होते. या यंत्राच्या साह्याने एका दिवसात एक बैलजोडी दीड एकर क्षेत्र पूर्ण करते.

सायन कुळव

या अवजारास दोन लोखंडी फणांना आडवी पास जोडलेली असते. हे अवजार पाच ते साडेपाच महिन्यांनी ऊस लागवडीनंतर कृषिराज यंत्र चालविल्यानंतर लगेचच पाठीमागे चालवितात. या अवजारामुळे जमीन भुसभुशीत व सपाट होते, तणांचा बंदोबस्त होतो, त्यामुळे खुरपणीचा खर्च वाचतो व माती भुसभुशीत झाल्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते. जमिनीतील अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध होतात व पिकाची वाढ चांगली होते.

तीन पहारीचे अवजार

या अवजारास तीन लोखंडी पहारी 45 अंशांच्या कोनात जोडलेल्या असतात. या अवजाराचा उपयोग ऊस पिकातील सरी-वरंबा फोडण्यासाठी केला जातो. उसाच्या बाळ बांधणीच्या वेळी या अवजाराचा वापर सरी-वरंबा फोडण्यासाठी व जमीन भुसभुशीत करण्यासाठी, तणनियंत्रण करण्यासाठी केला जातो. ऊस साडेचार ते पाच महिन्यांचा झाल्यावर उसाची मोठी बांधणी केली जाते. या वेळी तीन पहारीच्या यंत्राच्या साह्याने वरंबा फोडून जमीन भुसभुशीत केली जाते. त्यानंतर रिजरच्या साह्याने मोठी बांधणी केली जातो.

पॉवर टिलर

पॉवर टिलरच्या साह्याने उसामधील आंतरमशागतीची कामे केली जातात. या यंत्रामध्ये कामानुसार बदल करता येतो. हे यंत्र स्वयंचलित असून, सरी-वरंबा फोडणे, उसाला भर देणे, उसाची बांधणी करणे, उसातील जमीन सपाट करणे, तणनियंत्रण करणे इ. कामे केली जातात. आंतरमशागतीच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत करता येते. या यंत्राच्या साह्याने एक मजूर एक ते दीड एकर क्षेत्र एका दिवसात पूर्ण करतो. अशा प्रकारे सुधारित अवजारांचा व यंत्रांचा वापर आंतरमशागतीसाठी केल्यास येणारा खर्च कमी होतो, वेळेत बचत होते व उत्पादनातही वाढ होते.

ऊसलागणी यंत्र

हा प्लॅन्टर ४५ अश्वशक्तीचा ट्रॅक्टरचलित आहे.  या प्लॅन्टरने चांगल्या दिवसात ५ – ६ एकर ऊसलागण करता येते.  मजुराकरवी मळ्यातले बेणे तोडून वाडे खंडून पाचट साळून प्लॅन्टरला फक्त पुरवावे लागे.  बेणेप्रक्रिया खत घालणे, बेण्याच्या पाहिजे तशा टिपऱ्या करून कोरडी लागण करणे हि सर्व कामे प्लॅन्टरने चांगल्या पद्धतीने करता येतात.  ऊसउगवणीचे अनुभव आतिशय चांगले आहेत.  द्रय्वार्सः ४ ते ५ मजुरांत दिवसाला

५ ते ६ एकर उसाची लागण प्लॅन्टरने होऊ शकल्याने केवळ मजुरीत ६२ टक्के बचत होते आणि कमी कालावधीत हंगामात वेळेवर लागण करणे शक्य होते.

२. ऊसतोडणी यंत्र. 

दिवसेंदिवस ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे.  नव्हे हा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.  केवळ तोडणीमुळे उसाचे गाळप होऊ शकलेले नाही.  असे दरवर्षीच घडत असते. शिवाय खर्च अमाप होतो.  वेळ लागतो.  यासाठी उसाची वेळेवर तोडणी होऊन गाळप होण्यासाठी हार्वेस्टरचा चांगला उपयोग होतो.  या चापर हार्वेस्टरमुळे ऊस जमिनीलगत योग्य प्रकारे तोडला जातो. लोळलेला ऊससुद्धा या चापर हार्वेस्टरणे चांगल्या प्रकारे तोडला जातो.  मजुराकारवी तोडणीच्या खर्चापेक्षा निम्म्याने खर्च कमी होतो.  तोडणी जलद गतीने होत असल्याने कारखान्यांना  क्षमतेएवढा सतत ऊस पुरविणे शक्य होते.  त्यामुळे इथून पुढे ऊसशेतीत ऊसतोडणीसाठी चपर हार्वेस्टरचा वापर अनिवार्य आहे.

उसाच्या पाचटीने व्यवस्थापन खर्चिक आणि किचकट काम असल्याने प्रत्येक जण सरसकट पाचट जाळून मौल्यवान सेंद्रिय खतांची राख करतात.  म्हणजे आपणच आपल्या शेतीला तिनचं दिलल खत हिरावून घेतो.  हि एक प्रकारी गद्दारीच म्हणावी लागेल.  आपल्या संशोधकांनी याच्यावर संशोधन करून ट्रॅक्टरचलित  पाचटीचे तुकडे करणारे यंत्र शोधून काढले आहे.  अगदी थोडक्या वेळेत एकरात ४ ते ५ टन पाचटाचे बारीक तुकडे करून मातीत मिसळण्याचे महान काम या यंत्राद्वारे केले जाते.  शिवाय ऊसखोड्व्यांच्या बुटक्या तोडण्याचे कामही वाचते.  खोडवा चांगला फुटतो.  आता हे यंत्र उपलब्ध आहे.  याचा वापर करून मौल्यवान पाचट पुन्हा तुकड्याच्या रूपाने त्याचं जमिनीला द्या.

या यंत्राशिवाय ऊसशेतीसाठी सबस्वायलर, अंतरमशागतीची म्हणजे चाळणी – बांधणीची औजारे बैलचलीत ट्रॅक्टरचलित आणि पावर ट्रॅक्टरचलित आहेत.  त्याचा वापर जरूर करावा.

एकंदरीत मजूर आणि मजुरी खर्चात बचत करण्यासाठी वेळेवर काम होण्यासाठी, दर्जेदार होण्यासाठी आणि उत्पादनवाढीसाठी या यंत्रे अगर औजाराचे महत्व ओळखून त्यांचा जरुर वापर करून फायदा करून घ्यावा.

145 total views, 0 views today