413709

ऊस लागवड

ऊस लागवड

ऊस बेणे मळ्याचे व्यवस्थापन

शेतकऱ्यांनी उसाच्या कोणत्या जातीचे बियाणे लावावे हे कारखान्यांनी भौगोलिक परिस्थिती, प्रचलित बियाणे मागणी आणि दुष्काळात टिकून राहतील अशा प्रजातींचा विचार करावा.. शक्‍यतो कोसी 671, को 86032 , कोव्हीएसआय 9805 व्हीएसआय 434 कोएम 0265 आणि कोव्हीएसआय 03102 या प्रजातीचे उत्पादन घ्यावे.

 • चांगला निचरा होणारी मध्यम खोल काळी सुपीक जमीन निवडावी. ऊस लागणी अगोदर उभी आडवी नांगरट आणि रोटव्हेटच्या साहाय्याने जमीन भुसभुशीत करावी. प्रति एकर 20 टन शेणखत किंवा शिफारशीनुसार बायोकंपोस्टचा वापर करावा.
 • हलक्‍या जमिनीत सरीतील अंतर 3.5 ते चार फूट ठेवावे किंवा जोड ओळ केल्यास 2.5 ु 5.0 फूट अंतर ठेवावे. मध्यम ते खोल भारी जमिनीत सरीतील अंतर 4.5 ते पाच फूट आणि जोड ओळ केल्यास 3.0 ु 6.0 फूट अंतर ठेवावे.
 • पायाभूत बेणे प्लॉट किंवा नेहमीच्या उसातून बेणे प्लॉटची निवड करताना उसाचे बेणे जाड, सशक्त आणि रसरशीत असावे. डोळे फुगीर असावेत, जून किंवा निस्तेज नसावेत, बेण्यासाठी 10 ते 11 महिन्याचे प्लॉट निवडावेत, बेणे रोग आणि कीडमुक्त असावे, मुळ्या फुटलेला. पांक्षा फुटलेला किंवा तुरा आलेला प्लॉट निवडू नये.
 • निवड केलेल्या प्लॉटमधून बेणे पाचट न साळता वाढे न तोडता लागणीच्या ठिकाणी आणून मगच साळून उसाच्या टिपऱ्या कराव्यात. बेणे धारदार कोयत्याने उभे राहून न तोडता ओंडक्‍यांवर खांडावे. बेणे खांडताना ऊस न पिचता डोळ्याच्या खालील भाग 2/3 आणि शेंड्याकडील 1/3 भाग राहील याची काळजी घ्यावी. बेणे काही कारणाने शिळे झाल्यास 500 ग्रॅम चुना प्रति 200 लिटर पाण्यात द्रावण तयार करून बेणे टिपऱ्या या द्रावणात 24 तास बुडवून ठेवून मगच लागण करावी.
 • बेण्याद्वारे प्रसार होणाऱ्या रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी 100 ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि 300 मि.लि. मॅलेथिऑन प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून बनविलेल्या द्रावणात बेणे टिपऱ्या 15 मिनिटे बुडवून बेणे प्रक्रिया करावी.
 • ऊस लागणीचे वेळी अझोटोबॅक्‍टर आणि स्फुरद विरघळविणारे द्रवरूप जिवाणू खत प्रत्येकी एक लिटर किंवा ऍझो-फॉस्फो द्रवरूप खत प्रति एकर एक लिटर या प्रमाणात शेणखतात मिसळून चळीत टाकून लागण करावी किंवा 250 लिटर पाण्यातून आळवणी करावी.
 • बेणे मळा करताना लागवडीसाठी चांगले बेणे आणि सरी डोस (बेसल डोस), बेणे प्रक्रियेसाठी बुरशीनाशक व कीटकनाशक, जैविक खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये इ. निविष्ठांची उपलब्धता करावी.
 • बेणे मळ्यासाठी निवड प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी करखान्याचे ऊस विकास अधिकारी, कृषी विभाग, व्हीएसआयचे शास्त्रज्ञ/तांत्रिक अधिकारी यांच्या मदतीने करावी.
 • बेणे मळा साधारण 45 ते 60 दिवसांचा झाल्यानंतर प्रति एकर एक लिटर द्रवरूप ऍसिटोबॅक्‍टर 200 लिटर पाण्यात मिसळून उसाच्या पानांवर फवारणी करावी.
 • बेणे मळा साधारण 70 ते 75 दिवसांचा झाल्यानंतर मल्टिमॅक्रोन्युट्रिएंट आणि मल्टिमायक्रोन्युट्रिएंट प्रति एकरी प्रत्येकी दोन लिटर प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून उसाच्या पानांवर फवारणी करावी. दुसरी फवारणी तीन लिटर प्रति 300 लिटर पाण्यात मिसळून एक महिन्याच्या अंतराने करावी.

ऊस रोप निर्मिती

1) ऊस रोपवाटिकेसाठी बेणे मळ्यातील नऊ ते 11 महिने वयाचे, सुधारित जातीचे शुद्ध, जाड, रसरशीत, लांब कांड्यांचे, निरोगी बेणे वापरावे. बेणे तोडल्यापासून शक्‍यतो 24 तासांच्या आत त्याची लागवड करावी.
2) प्लॅस्टिक ट्रेमध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण 30 ते 40 दिवसांची झाल्यावर लागवडीयोग्य होतात, त्यासाठी ऊस लागणीअगोदर एक महिना ट्रेमध्ये रोपे तयार करावीत.
3) बेणेमळ्यातील बेणे आणल्यानंतर एक इंच लांबीचे एक डोळ्याचे तुकडे करावेत.
4) एक डोळ्याचे तुकडे पाच ते दहा मिनिटे कार्बेन्डाझिमच्या (10 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लिटर पाणी) द्रावणात बुडवून नंतर ते सावलीत सुकवावेत.
5) बेणे थोडे सुकल्यानंतर जिवाणूसंवर्धनाची बेणेप्रक्रिया करावी, त्यासाठी 10 लिटर पाण्यात एक किलो ऍसिटोबॅक्‍टर + एक किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) + 1.5 ते 2 किलो शेण मिसळून त्यात 30 मिनिटे बेणे बुडवून नंतर पाच मिनिटे सावलीत सुकवून ट्रेमध्ये लागवडीसाठी वापरावे.
6) 25 किलो कोकोपीटमध्ये साधारणपणे दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक किलो युरिया चांगले मिसळून, ते प्लॅस्टिक ट्रेमध्ये कपात एक तृतीयांश भरून घ्यावे. नंतर त्यावर एक डोळा कांड्या ठेवाव्यात. त्यावर पुन्हा कोकोपीट टाकून ट्रे पूर्ण भरून घ्यावेत.
7) ऊस बेणे लागण झाल्यावर गरजेनुसार झारीने अथवा सूक्ष्म तुषार संचाने पाणी द्यावे.
8) ट्रेमध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण 30 ते 40 दिवसांची झाल्यावर शेतात लागणीसाठी वापरावीत.

उसाचे बियाणे सीड केन क्रॉप तयार करणे

बियाण्याचा ऊस तयार करण्यासाठी मातीमध्ये कोणतीही समस्या नसलेला (उदा. खारटपणा, आम्लता, पाणी साठणे इ.) व जमिनीच्या एकंदर पातळीपेक्षा वर असलेला भाग निवडा. तेथे जलसिंचनाची चांगली सोय हवी. जमीन चांगली नांगरून लावणीआधी १५ दिवस दर हेक्टरी २०-२५ टन ह्या प्रमाणात शेतावरचे खत घाला. रेट रॉट किडीचा प्रसार टाळण्यासाठी नाल्या खणून पाण्याचा निचरा व्यवस्थित करा तसेच ह्या भागात आजूबाजूचे पाणी शिरू देऊ नका.

 • रोपवाटिकेमधून पूर्वी वाढविलेल्या पिकातून बियाण्याची निवड करा आणि सेट्स बनवा. RSD व GSD सारख्या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी जंतुविरहित केलेलेच सेट्स वापरा.
 • उगवणीचे प्रमाण चांगले राखण्यासाठी तसेच रोगांचा प्रसार रोखण्यासाठी ऑर्गॅनोमर्क्युरियल ट्रीटमेंटचा तसेच ऊष्णतेचा वापर करा (हीट ट्रीटमेंट).
 • सेट्सचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी दोन ओळींत कमी म्हणजे ७५ सेंमीचेच अंतर ठेवा.
 • नेहमीच्या ऊस पिकापेक्षा बियाण्याचा दर २५% जास्त ठेवा
 • पोषकद्रव्यांचा जास्त डोस द्या – दरहेक्टरी २५० किलो N + ७५ किलो P2O5 + १२५ किलो K2O
 • वातावरणीय बाष्पीभवनाचे प्रमाण (ETo) तसेच पिकाची अंगभूत वैशिष्ट्ये (Kc) लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिकाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये भरपूर पाणी द्या.
 • पिकाच्या चांगल्या वाढीसाठी तसेच रोग व किडींचा प्रसार रोखण्यासाठी शेतातील तण सतत काढत रहा.
 • रोग व किडींवर नजर ठेवण्यासाठी शेतातून सतत हिंडून पाहणी करा.
 • जमिनीत इतर जातींची रोगग्रस्त खोडे-मुळे इ. शिल्लक असल्यास ती काढून टाका
 • लॉजिंग, बाइंडिंग व प्रॉपिंगपासून पिकाचे संरक्षण करा.

७ – ८ महिन्यांत पीक तयार होते. असा पिकापासून मिळवलेल्या सेट्सवर दमदार फुटवे असतात. ह्याशिवाय त्यांच्यात अधिक आर्द्रता, पुरेशी पोषकमूल्ये, विघटनयोग्य साखरेचे अधिक प्रमाण असल्याने त्यांची वाढ चांगली होऊन त्यांपासून अंतिमतः चांगले व भरपूर व्यापारी उत्पादन मिळण्यास मदत होते.
मुख्य शेतात लावण्यासाठी सेट्स तयार करणे

 • लावणीआधी एक दिवस बियाण्याची मशागत करा ज्यायोगे जास्त टक्केवारीने व एकसारखे पिक मिळू शकेल.
 • बियाणांवर प्रक्रिया करून पेरणी आधी एक दिवस सेट्स तयार ठेवा.
 • बियाणांच्या ह्या उसाच्या खोडावर मुळे व फुटवे नसावे.
 • सेट्स कापताना कळ्या व फुटव्यांना इजा पोहोचू देऊ नका.
 • दोन-तीन हंगामां नंतर बियाणे बदला. जुन्या उसाचा वापर करणे भागच असले तर त्याचा वरचा एक-तृतियांश भाग वापरा.

बियाण्यांचा आदर्श ऊस

 • ७-८ महिने वयाच्या पिकापासून मिळवलेलेच बियाणे नेहमी परा.
 • रेड रॉट, विल्ट, स्मट, रॅटन स्टंटिंग आणि ग्रासी शूट ह्यांसारख्या रोग व विकृतींपासून मुक्त असलेलाच ऊस वापरा.
 • हाताळणी व ने-आण करताना फुटवे खराब होऊ देऊ नका
 • फुटव्यात अधिक आर्द्रता, पुरेशी पोषकमूल्ये, विघटनयोग्य साखरेचे अधिक प्रमाण असावे.
 • ह्या उसाच्या खोडावर मुळे व फुटवे नसावे.
 • उत्कृष्ट दर्जा

ऊसासाठी पाणी व्यवस्थापन

उसाच्या पिकाला ऊस उगवे पर्यंत म्हणजे पहिला १// महिना १/३ सरी भिजेल एवढ, फुटव्याचा कालावधी १// ते ३ महिने अर्धी सरी भिजेल एवढ, कांडी सुटण्याची ते जोमदार वाढीच्या म्हणजे ३ ते १० महिने पाऊण सरी भिजेल एवढ आणि पक्वतेचा कालावधी म्हणजे १० महिने ते ऊस तुटेपर्यंत पानसरी भिजेल एवढे पाणी द्यावे. हंगामानुसार आणि ऊस पिकाच्या गरजेनुसार लागवनी पासून तुटेपर्यंत पाण्याच्या पाळ्यातल अंतर कमी- जास्त कराव. पारंपारिक सरी, कट पद्धत, सरी वरंबा -नागमोडी पद्धतीने पनी देण्यात कोणताच फायदा होत नाही. उत्पादन कमी येते. जमिनी नापीक बनतात. पाणी जास्त लागते. म्हणून पारंपारिक सिंचनाच्या पद्धती बदलून लांब सरी पद्धतीने पाणी द्यावे. त्याचे अनेक फायदे होतात. रानबांधनीच्या खर्चात बचत, लागवडीखालचे क्षेत्र वाढते, पाणी कमी लागते. हवा- पाणी + अन्नद्रव्यांचे योग्य संतुलन होते. आंतर मशागत सुलभ आणि कमी खर्चात होते. असे अनेक फायदे होतात.

पट्टा पद्धत

पट्टापद्धत ठिबक सिंचनासाठी जास्त उपयुक्त ठरते. तसेच पाटपाण्यासाठी सुद्धा. कारण पहिले ४ महिने ८०% क्षेत्रावर पाण्याचा वापर, तर मोठ्या बांधणीनंतर ४०% क्षेत्रावरच पाण्याचा वापर होतो. १० ते २०% पाणी कमी लागते. पट्ट्यांत आछ्यादन केल्यास आणखी पाणी वापर कमी होतो. शिवाय पट्टा पद्धतीचे जे काही इतर फायदे आहेत ते मिळतातच.

एका सरीत पाणी तर दुसरी रिकामी अश्या पद्धतीने एकसरी पट्टा पद्धतीने उसाच्या सरीला पाणी दिले असता १५ ते २०% पाणी कमी लागते. रिकाम्या सरीला पट्टा पद्धतीप्रमाणे आंतरपीक घेत येते. पाचटाचे आछ्यादन करता येते. उत्पादन कमी पाण्यात जास्त मिळते.

पट्टा पद्धतीने उसाची लागण करून ठिबक-सिंचनाद्वारे पाणी देत येते. गरजेइतकेच मुळाजवळ पाणी दिल्याने पाण्यात ४० ते ५०% बचत होते आणि उत्पादनात २५ ते ३०% वाढ होते. याशिवाय द्रवरूप खत ठिबक सिंचनातून दिल्यास खतमात्रेत ३०% बचत होते. उत्पादन मात्र वाढीव मिळते. पिकाच्या गरजेनुसार पाणी दिल्याने जमीन नापीक होत नाही. फक्त गरज असते ठिबक- सिंचन सुरळीत चालण्यासाठी वेळच्या वेळी योग्य ती निगा राखण्याची.

शक्यतो ऊसपिकाल ऊस मोठा झाल्यानंतर साधी तुषार सिंचन पद्धत तितकीशी फायद्याची नाही. पण रेनगन तुषार सिंचन पद्धत फायद्याची ठरली आहे. १ अगर २ रेनगनमद्धे संपूर्ण शेत भिजवत येते. गरजेइतके पाणी देत येत असल्यामुळे पाण्याचा अनावश्यक अपव्यय टाळता येतो. पाचटाचे आछ्यादन केले असल्यास पाचट लवकर कुजते. ठिबकपेक्षा खर्च कमी येतो. विद्राव्य खते देता येतात. ऊस पावसाच्या पाण्यासारखा धुतला जात असल्याने किडी – रोग कमी येतात.

सुरु साठी २५०, पूर्व हंगामासाठी २७५ आणि आडसालीसाठी ३५० हेक्टर सेंटीमीटर पाण्याची गरज असते. हवामान-जमिनीचा प्रकार, जमिनीची खोली, पिकाचे वय ई. वर पाण्याच्या पाळीतील अंतर ठरवावे. पाणी मोजण्यासाठी ‘कटथ्रोट फ्ल्युम‘ या पाणी मोजण्याच्या साधनाचा वापर करावा.

ऋतूमानानुसार पाणी व्यवस्थापन

भारी जमिनीत-

* पावसाळ्यात २६ दिवसांनी

* हिवाळ्यात २० दिवसांनी

* उन्हाळ्यात १२-१३ दिवसांनी

मध्यम जमिनीत-

* पावसाळ्यात १८ दिवसांनी

* हिवाळ्यात १४ दिवसांनी

* उन्हाळ्यात ९ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

पाणी कमी पडल तर पाचटाचे आछ्यादन, केओलीनाचा वापर, पोटश २५% जास्त द्यावे, तण नियंत्रण, पाट स्वछ्य ठेवावेत आणि विशेष म्हणजे महिन्यातील पाण्याची उपलब्धता पाहून ऊसाखाली क्षेत्र घ्यावे.

अश्या पद्धतीचे पाणी व्यवस्थापन ऊसासाठी उपयुक्त आहे.

उसाला पहारीने खत पद्धती

उसाच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा कार्यक्षमपणे वापर होण्यासाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे प्रयोग घेण्यात आले. त्यामध्ये पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने खते दिल्यास इतर पद्धतींपेक्षा अधिक ऊस उत्पादन व आर्थिक फायदा झाल्याचे दिसून आले. या पद्धतीत खतमात्रा दोन समान हप्त्यांत द्यावी लागते. पहिली खतमात्रा खोडवा ऊस तुटल्यानंतर वाफसा आल्यावर 50 टक्के रासायनिक खताची शिफारशीत मात्रा (सूक्ष्म अन्नद्रव्यांच्यासह) पहारीच्या साह्याने बेटापासून 15 सें. मी. अंतरावर आणि 10 ते 15 सें. मी. खोल छिद्र घेऊन उसाच्या एका बाजूस द्यावी. दोन छिद्रांमधील अंतर 30 सें. मी. ठेवावे. दुसरी मात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने 135 दिवसांनी द्यावी.

ऊस पिकातील तण नियंत्रण

देशात केवळ तणांमुळे सरासरी 30 ते 40 टक्के इतक्‍या मोठ्या प्रमाणात पीक उत्पादनात घट येते. एकूण कृषी उत्पादनाच्या होणाऱ्या किमतीच्या किमान 10 टक्के घट निव्वळ तणांचे नियंत्रण वेळीच न केल्यामुळे होते. तणांमुळे होणारे ऊस पिकाचे नुकसान हे कीड व रोग यांमुळे होणाऱ्या नुकसानीपेक्षा जास्त आहे; परंतु मजुरांची कमतरता व मजुरीचे वाढीव दर यामुळे तणांच्या बंदोबस्ताचा प्रश्‍न अधिक गुंतागुंतीचा बनलेला आहे. उसामध्ये सर्वसाधारणपणे हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, कुंदा, केना ही अरुंद पानांची (एकदल) गतवर्गीय तणे आणि घेळ, माठ, गाजरगवत, चांदवेल, दुधानी, उंदीरकानी, गोखरू ही रुंद पानाची (द्विदल) गवतवर्गीय तणे आढळतात. या तणांच्या नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

प्रतिबंधात्मक उपाय

यामध्ये पूर्वीचे पीक निघाल्यानंतर हराळी आणि लव्हाळा यासारख्या बहुवार्षिक व इतर तणांचा बंदोबस्त करण्यासाठी जमिनीची उभी- आडवी खोल नांगरट, ढेकळे फोडणे, कुळवणी करणे, तणांचे अवशेष गोळा करून जाळून नष्ट करणे इत्यादी उपाययोजना केल्या जातात. मात्र, मशागत करताना पुढील गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
1) जमिनीची नांगरट, ढेकळे फोडणे, कुळवणी करणे इ. मशागतीची कामे वेळेवर पूर्ण करावीत.
2) तणे, धसकटे वेचून जाळून नष्ट करावी.
3) खतांच्या योग्य मात्रा योग्य वेळी देऊन उसाची जोमदार वाढ करावी.
4) गाजरगवतासारखी तणे बी येण्यापूर्वीच उपटून टाकावीत.

निवारणात्मक उपाय

उसामध्ये सुरवातीच्या काळात आंतरपीक घेतल्यास स्पर्धात्मक पद्धतीने तणांच्या योग्य बंदोबस्तासह हिरवळीच्या खताचा फायदा होतो. उसातील दोन ओळींत मोकळ्या जागेवर पाचटाचे आच्छादन केल्यास तणांच्या वाढीस आळा बसतो.
या तण नियंत्रण पद्धतीत अवजाराचा वापर करून बाळबांधणी करावी, त्यासाठी दातेरी कोळप्याचा वापर करावा. ऊस साडेचार महिन्यांचा झाल्यावर रिजरचा वापर करून मोठी बांधणी करावी. मोठी बांधणी करण्याच्या कालावधीपर्यंत म्हणजे उगवण पूर्ण झाल्यापासून तीन ते साडेचार महिन्यांपर्यंत वेळोवेळी आंतरमशागत करावी, यामुळे तणांचे प्रमाण कमी होते.

जैविक पद्धतीने तण नियंत्रण

या पद्धतीत तणांवर जगणाऱ्या किडी आणि रोगजंतू यांद्वारे तण नियंत्रण करता येते. उदा. गाजरगवत या तणाचे निर्मूलन झायगोग्रामा बायकलरॅटा (मेक्‍सिकन भुंगा) या जैविक कीटकांद्वारे करता येते.

रासायनिक तण नियंत्रण

टीप – ऊस उगवल्यानंतर वरंब्यावरील तणांवर तणनाशक फवारावे. तणनाशक ऊस पिकावर पडू देऊ नये. उभ्या उसात तणनाशक फवारणी पंपासाठी डब्ल्यूएफएन- 40 (व्ही आकाराचा) नोझल वापरावा व नोझलवर प्लॅस्टिक हूड बसवावे.

ऊस पिकात आंतरपिकानुसार तणनाशकांचा वापर

उसामध्ये आंतरपिकाचा समावेश केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव फारसा दिसत नाही; परंतु आवश्‍यकतेनुसार खुरपणी करावी व खाली दिल्याप्रमाणे निवडक रासायनिक तणनाशकांचा वापर करावा.

तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी

 • शिफारशीनुसार योग्य प्रमाणात व वेळेवर तणनाशकांचा वापर करावा.
 • तण उगवणीपूर्वी तणनाशक फवारताना द्रावण सतत ढवळावे, संपूर्ण क्षेत्रावर तणनाशक एकसारखे फवारावे.
 • तणनाशके फवारताना मागे- मागे सरकत यावे व फवारलेली जमीन तुडविली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
 • तणनाशकाची सर्वत्र समान दाबाने फवारणी करावी.
 • तणनाशक फवारल्यानंतर तीन ते चार दिवस जमिनीची कोणतीही मशागत करू नये, फवारणी केलेल्या क्षेत्रातील चारा जनावरांना वापरू नये.

उसाला संतुलित खत

ऊस पिकाच्या उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वाढ या वाढीच्या प्रमुख अवस्था आहेत. नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची मात्रा वाढीच्या अवस्थेनुसार चार वेळा विभागून द्यावी. मातीचे परीक्षण करून खतमात्रा देणे पीक वाढीसाठी फायदेशीर ठरते. ऊस पिकासाठी शिफारशीप्रमाणे एकरी आठ ते 10 टन शेणखत किंवा कंपोस्टचा वापर करावा. शेणखत किंवा कंपोस्ट उपलब्ध होत नसल्यास ऊस लागणीअगोदर ताग किंवा धैंचासारखी हिरवळीची पिके घेऊन जमिनीत गाडावीत. याशिवाय कारखान्यातील मळीपासून तयार केलेले बायोअर्थ कंपोस्ट, गांडूळ खत, कोंबडी खत, मासळी खत, हाडाचा चुरा, गळीत धान्याच्या पेंडी, तसेच खोडव्यात पाचटाचे आच्छादन याद्वारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविता येते. ऊस पिकासाठी खताची योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ, खत देण्याची योग्य पद्धत महत्त्वाची आहे. यामुळे पिकाच्या गरजेनुसार अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

उसासाठी रासायनिक खतमात्रा

लागण हंगाम +खत देण्याची वेळ +खतमात्रा (किलोग्रॅम/एकरी) +रासायनिक खते (प्रतिएकरी गोण्या)
+ + +पद्धत – सरळ खते
+ +नत्र +स्फुरद +पालाश +युरिया +सिंगल सुपर फॉस्फेट +म्युरेट ऑफ पोटॅश
आडसाली +लागवडीच्या वेळी (बेसल डोस) 6 ते 8 आठवड्यांनी 12 – 14 आठवड्यांनी मोठी बांधणीच्या वेळी +16 64 16 64 +35 — — 35 +35 — — 35 +1 3 1 2 +4.5 — — 4.0 +1.25 — — 1.0
+एकूण +160 +70 +70 +7 +8.5 +2.25
टीप – 1) को-86032 या ऊस जातीसाठी वरीलप्रमाणे शिफारशीत खतमात्रेच्या 25 टक्के मात्रा वाढवून द्यावी.
2) तक्‍त्यात दिलेली रासायनिक खते उदाहरण म्हणून दिली असून, शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण आणि प्रत्यक्ष पिकाला द्यावयाची मात्रा लक्षात घेऊन खतांचा वापर करावा.

खते देण्याची वेळ महत्त्वाची

1) उसाची उगवण ते फुटवे येईपर्यंत उसास नत्राची गरज कमी असते, तर उगवण, मुळांची वाढ व फुटव्यासाठी स्फुरद व पालाशची गरज जास्त असते.
2) ऊस लागण करताना एकूण शिफारशीत खतमात्रेपैकी 10 टक्के नत्र, 50 टक्के स्फुरद व 50 टक्के पालाश देणे फायद्याचे ठरते. फुटव्याच्या जोमदार वाढीसाठी नत्राची गरज जास्त असते, म्हणून सहा ते आठ आठवड्यांनी 40 टक्के नत्राची मात्रा द्यावी. जोमदार वाढीच्या अवस्थेच्या वेळी सर्वच अन्नद्रव्यांची गरज जास्त असते. म्हणून मोठ्या बांधणीच्या वेळी 40 टक्के नत्र, 50 टक्के स्फुरद व 50 टक्के पालाशची खतमात्रा द्यावी. मोठ्या बांधणीनंतर रासायनिक खते देण्याची गरज नाही.
3) गंधकाचा वापर – गंधक हे जरी दुय्यम मूलद्रव्य असले तरी उसासाठी त्याचा वापर महत्त्वाचा आहे. लागणीच्या वेळी एकरी 24 किलो मूलद्रव्यी गंधक शेणखतात मिसळून द्यावे. चुनखडीयुक्त विम्ल जमिनीत मूलद्रव्यी गंधक वापरावा, तर हलक्‍या प्रतीच्या आणि कमी चुनखडीच्या जमिनीत फॉस्फोजिप्सम किंवा कारखान्यातील प्रेसमड केकचा वापर करावा.
4) सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर – उसासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्याचे जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व लोह, जस्त, मॅंगेनीज, तांबे, बोरॉन आणि मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे आहे. माती परीक्षण अहवालानुसार जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास लागणीच्या वेळी देण्यात येणाऱ्या खतांच्या मात्रांबरोबर प्रतिएकरी फेरस सल्फेट 10 किलो, झिंक सल्फेट आठ किलो, मॅंगेनीज सल्फेट 10 किलो व बोरॅक्‍स दोन किलो शेणखतात मिसळून द्यावे.
5) उसासाठी सिलिकॉनचा वापर – जमिनीत सिलिकॉनचे प्रमाण जरी जास्त असले तरी बहुतांशी रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. सिलिकॉनची मोनोसिलिसिक आम्ल स्वरूपातील संयुगे क्रियाशील असतात आणि याच स्वरूपात पिकाकडून शोषण होते. शोषण केलेले मोनोसिलिसिक आम्ल पिकाच्या पेशीद्रव्यात सिलिका जेल स्वरूपात साठविले जाते. त्यामुळे पेशी कवच कठीण बनते. पानांतून पाण्याचे उत्सर्जन कमी होऊन अवर्षण परिस्थितीत पानांत पाणी टिकून राहते. रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रियेत वाढ होते, जमिनीत स्फुरदाची उपलब्धता वाढते. परिणामी ऊस आणि साखर उत्पादनात चांगली वाढ होते. यासाठी महाराष्ट्रातील मध्यम खोल काळ्या जमिनीत उसाच्या लागण आणि सलग दोन खोडव्यांचे अधिक ऊस व साखर उत्पादन घेण्यासाठी एकरी 160 किलो सिलिकॉन बगॅसची राख किंवा कॅल्शिअम सिलिकेट शेणखतात मिसळून ऊस लागणीच्या वेळेस एकदाच देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मल्टिमॅक्रोन्युट्रियंट आणि मल्टिमायक्रोन्युट्रियंट द्रवरूप खतांची फवारणी –

1) सूक्ष्म अन्नद्रव्यांची पिकाची गरज जरी कमी असली तरी या अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे आवश्‍यक असते. यासाठी मल्टिमायक्रोन्युट्रियंट आणि मल्टिमॅक्रोन्युट्रियंट या द्रवरूप खताच्या उसाच्या पानावर दोन फवारण्या कराव्यात म्हणजे ऊस उत्पादनात आठ ते 10 टक्के वाढ होते.
2) पहिली फवारणी – लागणीनंतर अथवा खोडवा राखल्यानंतर 60 दिवसांनी प्रति एकरी दोन लिटर मल्टिमॅक्रोन्युट्रियंट अधिक दोन लिटर मल्टिमायक्रोन्युट्रियंट प्रति 200 लिटर पाण्यात एकत्रित मिसळून फवारणी करावी.
3) दुसरी फवारणी – लागणीनंतर अथवा खोडवा राखल्यानंतर 90 दिवसांनी प्रति एकरी तीन लिटर मल्टिमॅक्रोन्युट्रियंट अधिक तीन लिटर मल्टिमायक्रोन्युट्रियंट प्रति 300 लिटर पाण्यात एकत्रित मिसळून फवारणी करावी.

खते देताना घ्यावयाची काळजी

सध्या आपण ज्या पद्धतीने रासायनिक खते देतो, त्यामध्ये दिलेल्या खतांपैकी नत्र 25 ते 30 टक्के, स्फुरद 15 ते 20 टक्के व पालाश 50 ते 60 टक्के पिकास उपलब्ध होतात. हे लक्षात घेता रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा.
1) खते जमिनीवर पसरून न देता ती मातीत मिसळण्यासाठी चळी घेऊन किंवा खत पेरणी अवजाराच्या साह्याने द्यावीत.
2) युरिया खत देताना निंबोळी पेंडीबरोबर 6 – 1 या प्रमाणात मिसळून द्यावीत.
3) हलक्‍या प्रतीच्या जमिनीत युरियाचा वापर जास्तीत जास्त वेळा विभागून करावा.
4) जमिनीमध्ये वाफसा असताना खते द्यावीत. जमीन कोरडी असल्यास किंवा पाणी दिल्यानंतर लगेच खते देऊ नयेत.
5) ऊस लागणीअगोदर बेणेप्रक्रिया – एक लिटर ऍसिटोबॅक्‍टर डायझोट्रॉफिक्‍स हे जिवाणू खत प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये बेणे 10 मिनिटे बुडवून ठेवावे किंवा लागणीनंतर 60 दिवसांनी उसाच्या पानांवर फवारणी केल्यास शिफारशीत नत्र खतमात्रेत 50 टक्के बचत होते.
6) स्फुरदयुक्त खते शेणखतात मिसळून मुळांच्या सान्निध्यात येतील अशा पद्धतीने द्यावीत. जमिनीत स्फुरदाची अविद्राव्य संयुगे तयार होतात आणि स्फुरद पिकास उपलब्ध होत नाही. सेंद्रिय खतातील सेंद्रिय आम्लामुळे स्फुरदाची अविद्राव्य संयुगे विरघळतात. एकरी एक लिटर स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खत प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून वाफसा स्थितीत जमिनीत आळवणी केल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते. शिफारशीत स्फुरद खतमात्रेत 25 टक्के बचत करता येते.
7) हिरवळीचे पीक घेऊन ऊस लागण करावयाची असल्यास उसासाठीचा स्फुरद खताच्या पहिल्या हप्त्यापैकी 50 टक्के हिरवळीच्या पिकास द्यावा. उरलेला 50 टक्के ऊस लागणीच्या वेळी सरीमध्ये द्यावा.
8) पाण्याचा ताण पडत असल्यास म्युरेट ऑफ पोटॅश या खताची मात्रा एकरी 50 किलो वाढवून द्यावी.
9) शिफारशीप्रमाणे एकरी 24 किलो गंधकाचा वापर केला असता स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही उपलब्धता वाढते.
10) पालाशयुक्त खते पाण्याच्या निचऱ्यावाटे वाहून जाण्याचा धोका कमी असतो. ही खतेदेखील सरीमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत. शक्‍यतो नत्रयुक्त खतांबरोबर दिल्यास नत्राच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो.
11) नत्र, स्फुरद आणि पालाश खतांची मात्रा युरिया, डायअमोनिअम फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश या खतांपासून तयार केलेल्या ब्रिकेटच्या माध्यमातून वाफसा स्थिती असताना पहारीने भोके घेऊन मुळांच्या सान्निध्यात दिल्यास रासायनिक खताची कार्यक्षमता चांगलीच वाढते.
12) ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीत युरिया आणि म्युरेट ऑफ पोटॅश ही खते ठिबक सिंचनाद्वारे सात ते आठ महिन्यांपर्यंत 12 ते 13 हप्त्यांत पिकाच्या गरजेप्रमाणे विभागून दिल्यास 30 टक्के खतमात्रेत बचत होऊन 10 ते 15 टक्के उत्पादनातही वाढ होते. ठिबक सिंचनाद्वारे दिलेली खते मुळांच्या सान्निध्यात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार गरजेप्रमाणे देता येतात आणि निचऱ्याद्वारे होणारे अन्नद्रव्यांचे नुकसान टाळता येते.

45 total views, 0 views today