413709

केशव-गोविंद मंदिर बेलापुर बु.

श्री हरिहर केशव गोंविद महाराज स्थान माहात्म्य
                           जेव्हा नव्हती वैकुंठ नगरी| तेव्हा होती पंढरी|| असे पुराणात म्हटले आहे.तसेच श्री पांडुरंगाचे आरतीत ‘युगे‘अठ्ठावीस विटेवरी उभा’ असा उल्लेख आहे. असे महाराष्ट्राचे दैवत पंढरपूर आहे. लाखो वारकरी पंढरपूरला पायी वारीला जातात. पूर्वीच्या काळी बेलापूर बन येथे बेल, बाभूळ, चिंच, लिंब इत्यादीचे दाट जंगल होते. महादेवाने पार्वती मातेची तहान शमाविण्यासाठी जमिनीवर बेलाचे पान टाकले. तेथे पातळातून गंगा आली.ते बिल्वतीर्थ प्रसिध्द आहे. कालांतराने प्रवरानदी या बिल्वतीर्थावरून वाहू लागली. सुमारे १ हजार वर्षापूर्वी त्या भागात डांगू व नगू दोन बंधू पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. ते नित्य पंढरीची वारी करीत असत. वार्धक्याने त्यांना वारीला जाणे अशक्य झाले. त्यांची भक्ती पाहून पांडुरंगाने त्यांना स्वप्नात दुष्टांत देऊन चंदनाचे लाटाचे रूपात श्री केशव,श्री गोंविंद अवतरले. ते मूळ स्थान श्री केशव गोंविंद बन. भगवंताने गीतेत म्हटले आहे “आकाशात पतीतं तोयं, यथा गच्छती सागरम्| सर्व देवी नमस्कार केशव प्रति गच्छति”
प्रत्येक गावाचे ग्रामदैवत वेगवेगळे असते. त्याप्रमाणे बेलापूर बु||या गावाचे ग्रामदैवत श्री केशव गोविंद आहे. श्री संत तुकाराम महाराज यांनी तुकाराम गाथ्यात म्हटले आहे. ‘ठायीच बैसोनि करा एकचित्त|
                               आवडी अनंत आळवावा, भक्तांच्या आशा आकांक्षा पूर्तीसाठी बेलापूर परिसरात श्री पांडुरंग केशव गोविंद स्वरूपात अवतरले.
केशव लोखंडे हा तारू जाती भक्त दर सोमवारी श्री केशव गोविंद बनात नित्यनियमाने जात असे. त्यावेळी प्रवरा नदीचे पात्र खूप खोल होते. पावसाळ्यात नदीला महापूर येत असे. तरी या पुराच्या पाण्यातून केशव भगत पोहत
जात असे. कालांतराने त्याला वृध्दत्व आले. तरी तो धैर्याने जात असे. भगवंताने त्याची परीक्षा पाहण्यासाठी तो शक्तिहीन झाल्यामुळे नदीच्या पुरात तो खाली खाली वाहत चालला. त्याने अत्यंत काकुळतीने भगवंताचा धावा केला. सुदैवाने तो किनाऱ्याला लागला. त्याला भगवंताचा साक्षात्कार झाला. तो नित्य नियमाप्रमाणे बनात दर्शनासाठी गेला. तेथे भगवंत म्हणाले, ‘अरे केशवा, तुझी भक्ती पाहून मी प्रसत्र झालो. तू आता दर्शनाला येऊ नको. आम्हीच तुझ्या गावी प्रवरेकाठी येता. तू पूढे चाल, मागे पाहु नको, त्याप्रमाणे केशव भगत निघाला. पाठोपाठो देवही आले.काही अंतरावर त्याने मागे वळुन पाहिले देव येतात की नाही. तात्काळ देव तेथेच थांबले. त्याला विसावा असे म्हणतात.
                          अजूनही ते ठिकाण अस्तित्वात आहे. तेथे लिंब व पिंपळ दोन वृक्ष आहेत.
केशव भगवंताने देवाला विनवणी केली देवा, चुकलो मी, मला क्षमा करा देव म्हणाले, तु पुढे चल. आम्ही
चंदनाचे लाटांचे स्वरूपात पात्रातून येतो. त्याप्रमाणे प्रवरेच्या प्रवाहातून चंदनी लाटांच्या रूपात देव इंद्रबिल्वेश्वराजवळ थांबले. केशव भगताने आनंदाने नाचत नाचत लोकांना सांगितले. देव आले देव आले, अफाट जनसमुदाय जमला आणि प्रवरेकाठी त्याची स्थापना केली. तेथे केशव भगत झोपडी बांधून राहू लागला. अशा रितीने केशव गोविंद हे बेलापूरचे ग्रामदैवत झाले.
शके १२०० शतकाचे शेवटी (सुमारे ७२५ वर्षापुर्वी) यवनाचे राजवटीत हलाम एणुजेकांत नावाचा अधिकारी होता. त्याचे पदरी जनार्दनपंत काईत हा दिवाण होता. त्याचेवर वरिष्ठांची गैरमर्जी झाली. त्यामुळे जनार्दनपंतांना
बडतर्फ केले. जनार्दनपंत बेलापूरला आले. त्यांनी प्रवरेकाठी वास्तव्य करून श्री हरिहराची सेवा सुरू केली. त्याने हरिहराला सव्वालक्ष प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प केला व त्यांनी तो संकल्प पूर्ण केला. त्याचे फळ म्हणून वरिष्ठांकडून त्याला नेण्यास पालखी आली. पालखीत मिरवत नेऊन बादशहाने त्याला दिवाणगिरी बहाल केली. ही हरिहराला कृपा झाली म्हणून त्यांनी प्रवरेकाठी घाट बांधला व हल्लीचे भव्य मंदिर बांधून तेथे हरिहराच्या स्तंभाची प्रतिष्ठापना केली. हा काळ सुमारे १ हजार वर्षापूर्वीचा असावा. देवळा भोवतीच्या पडशाळा शके १७०० श्रावण शु||
१ रोजी नारो गोपा कुलकर्णी, रा. राजुरी यांनी बांधल्याचा पुरावा पडशाळेवर लेख कोरलेला आढळतो. या देवस्थानाला इनामी जमिनी अजीबात नाही. मात्र देवाची पूजा अर्चा करण्यासाठी देव जोशी (सदाशिव काळे ) व गुणजोशी (लक्ष्मण जोशी गोरे ) यांना अष्टाधिकार दिले. श्रावण महिन्यात नित्यनियमाने रूद्राभिषेक, दर सोमवारी पालखीची मिरवणूक असे उत्सव साजरे होतात. सन १९८४ साली जीर्णोद्धार होऊन मार्बलचे (संगमरवरी) स्तंभ उभारण्यात आले. असे हे पंचक्रोशीत असलेले दैवत सेवाधारी जनांचे कल्याण करणारे व जागृत दैवत आहे. जो या त्रिस्थळीचे दर्शन घेतो. त्याला काशीविश्वेश्वराच्या दर्शनाचा लाभ मिळतो. उत्तरोत्तर भक्तांची वाढो , ही प्रभूचरणी प्रार्थना....!
संग्राहक
सी.सा.उंडे गुरूजी,बेलापूर
(दि.२६.०७.२०१०)