413709

ज्वारीवरील किडींचे व्यवस्थापन

ज्वारीवरील किडींचे व्यवस्थापन

प्रस्तावना

ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्याचे पीक असून याचा उपयोग धान्य आणि जनावरांसाठी चारा (कडबा) म्हणून होतो. परंतु, ज्वारीचे उत्पादन कमी होण्यास अनेक करणे आहेत, त्यापैकी महत्वाचे कारण म्हणजे पिकावर येणाऱ्या किडी व रोग. ज्वारी पिकात मुख्यतः खोडमाशी, मावा, तुडतुडे या किडींचा व दाण्यावरील बुरशी यांचा प्रादुर्भाव होतो. किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीचा पातळीच्या खाली ठेवण्यासठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

जमिनीची मशागत

१) पुरेसा पाऊस झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर पेरणी केल्यास खोडमाशी व मिजमाशी पासून पीक  वाचवू शकतो.

२) शेतातील पिकाची धसकटे व काडीकचरा वेचून जाळून टाकला तर त्यामध्ये असलेल्या किडींच्या  कोशांचा नाश होतो.

३) उन्हाळ्यात पिक काढणीनंतर शेताची नांगरट केल्यानंतर जमिनीतील किडीच्या अवस्था मरतात किंवा नैसर्गिक शत्रूला (पक्षी) बळी पडतात.

४) पिकांची फेरपालट करावी.

तांत्रिक व्यवस्थापन

१) आकर्षक सापळ्यांचा वापर करावा.

२) प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.

जैविक किड नियंत्रण

१) ट्रायकोग्रामा चीलोनीस  या परोपजीवी कीटकाच्या अंडी पुंजाचा वापर करावा.

२) क्रायसोपरला कार्निया या परभक्षी कीटकाच्या अंडी पुंजाचा वापर करावा

खोडमाशी:

१) CSHC-७, CSH-८, CSH-१५R, M३५-१, स्वाती, मालदांडी या खोडमाशीला प्रतिकार करणाऱ्या  वाणाची पेरणी करावी.

२) पुरेसा पाऊस झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर पेरणी करावी.

३) पिकांची फेरपालट करावी उदा: कापूस, भूईमुग किंवा सूर्यफूल

४) इमिडाक्लोप्रीड ७० WS @ १ ग्राम/१किलो बियाणे किंवा क्लोरोपायरीफॉस २० EC किंवा मोनोक्रोटोफोस ३६ WSC @ ४ मिली/१ किलो बियाणे या कीटक नाशकाची बीजप्रक्रिया करावी.

५) पेरणीवेळी दाणेदार फोरेट १०G किंवा कार्बोफ्युरोन ३G एकरी १ किलो याप्रमाणात बियाण्या बरोबर टाकावे.

६) खोडमाशी मासळीच्या वासाने आकर्षित होतात. मासळी पाण्यात भिजवून सापळ्यामध्ये वापरावे, सापळ्यामध्ये एका डबीत ठेवलेल्या डायक्लोरोव्हस या किटकनाशकाच्या वासामुळे मरतात. आणि सापळ्याच्या खाली असलेल्या डबीत गोळा होतात.

७) किडग्रस्त झाडे नष्ट करावीत.

८) सायपरमेथ्रीन १० EC @ २० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

खोडकीड

१) जमिनीची खोल नांगरट करावी

२) तूर, चवळी ही पिके आंतरपीक म्हणून घ्यावीत.

३) ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.

४) CSH-16, CSH-18, CSV-10, CSV-15, CSV-17 या खोडकिडीला प्रतिकार करणाऱ्या वाणाची पेरणी    करावी.

५) नत्राचा आणि स्फुरदाचा नियंत्री हप्ता दयावा.

६) किडग्रस्त झाडे नष्ट करावीत.

७) शेतामध्ये एकरी ट्रायकोग्राम चीलोनीस या परोपजीवी किटकाचा ५०००० अंडीपुंज म्हणजेच ४ ट्रायको कार्डचा वापर करावा.

८) क्लोरोपायरीफॉस २०% EC @ २०-२५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

९) दाणेदार कार्बारील ४% एकरी ४ किलो याप्रमाणात पोंग्यात टाकावे.

मावा व तुडतुडे

१) ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.

२) क्रायसोपरला कार्निया या परभक्षी किटकाचे एकरी २०००० अंडीपुंजाचा वापर करावा

३) नर कीटकांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे लावावेत.

४) पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी ४ लावावेत.

५) नत्रयुक्त खतांचा जास्त प्रमाणात वापर करण्याचे टाळावे.

६) डायमिथोएट ३०% EC @ १५ मिली किंवा मिथिल डिमेटोन २५% EC @ १२ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मिजमाशी

१) मिजमाशी उपद्रवग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी एकाच वेळी पक्व होणाऱ्या वाणांची एकाच वेळी पेरणी    करावी.

२) पिकांची फेरपालट करावी उदा: कापूस, भूईमुग किंवा सूर्यफूल

३) किडग्रस्त झाडे नष्ट करावीत.

४) मेलेथीओंन ५% भुकटी क्विनोलफॉस १५% भुकटी ८ किलो/ एकर या प्रमाणात कणसांवर धुरळावी

५) आवश्यकतेनुसार दुसरी धुरळणी/फवारणी पहिल्या धुरळणी/फवारणी नंतर ५-१० दिवसांनी करावी.

६) मेलेथीओंन ५०% EC @ २५-३० मिली/एकर या प्रमाणात फवारणी करावी.

148 total views, 0 views today