413709

ज्वारी लागवड

ज्वारी

 प्रस्तावना

ज्वारी एक सुपरिचित तृणधान्य. भारताच्या फार मोठ्या भागातील स्थानिक लोकांच्या आहाराचे ते मुख्य पीक आहे. समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्या वगळून इतरत्र, विशेषत: दक्षिणेकडील भागात, धान्य आणि जनावरांसाठी वैरण अशा दुहेरी हेतूने ज्वारीची लागवड केली जाते.ज्वारी ज्या भागात पिकविली जाते त्या भागातील गरीब लोकांचे ते आहारातील प्रमुख धान्य आहे. ज्वारीमध्ये तांदुळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.

पृथक्करण

ज्वारीच्या दाण्याचे प्रमुख घटक सर्वसामान्यपणे पुढील प्रमाणे आहेत. जलांश ११·९%, प्रथिन १०·४%, कार्बोहायड्रेट ७२·६.%, वसा १·९%, लवणे १·६%. ज्वारीतील प्रथिन गव्हातील प्रथिनापेक्षा जैवमूल्याच्या दृष्टीने श्रेष्ठ आहे; परंतु प्रथिन, व जीवनसत्त्व व लवणे यांचा एकत्रित विचार केला असता ज्वारी गव्हापेक्षा कमी दर्जाची ठरते.

हवामान

विषुववृत्तापासून ४५ अक्षांशांपर्यंत या पिकाची लागवड होते. आफ्रिका, आशिया, उ. अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांच्या उष्ण हवामानात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. या पिकाला साधारणतः २७° ते ३२° से. तापमान लागते, परंतु काही प्रकार ३८° ते ४४° से. तापमानातही वाढू शकतात. हिवाळी हंगामातील प्रकारांना १६° से. पर्यंत किमान तापमान चालते.सर्वसाधारणपणे हे पीक सपाट प्रदेशात वाढणारे आहे, परंतु कर्नाटकात काही प्रकार ९०० मी. उंचीवरील प्रदेशातही लागवडीखाली आहेत. वार्षिक ५० ते १०० सेंमी. पर्जन्यमानाच्या प्रदेशात ज्वारीचे पीक चांगले येते. ३० ते ४५ सेंमी. वार्षिक पर्जन्यमानाच्या विभागात दुर्जल शेती पद्धतीनुसार ज्वारीचे पीक घेतात. यापेक्षा कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात ओलीताखाली ज्वारीचे पीक घेतात.

जमीन

ज्वारीचे पीक अगदी रेताड व चोपण जमिनी सोडून बहुतेक सर्व प्रकारच्या काळ्या, मध्यम काळ्या अगर दुमट जमिनीत चांगले येते. काही मर्यादेपर्यंत क्षारधर्मी (अल्कलाइन) जमिनीत व pH मूल्य  ५·५ असेपर्यंत अम्लीय जमिनीतही हे पीक वाढू शकते.

फेरपालट

ज्वारीच्या पिकाच्या बाबत पिकांच्या फेरपालटीची आवश्यकता असते. त्याकरिता ज्वारीच्या पिकाची कडधान्याच्या पिकाबरोबर फेरपालट करणे जास्त उपयुक्त ठरते. फेरपालटीमुळे जमिनीच्या एकाच पातळीतील वनस्पतीपोषक द्रव्यांचे शोषण होत नाही. मुळे खोलवर जाणाऱ्या पिकानंतर ज्याची मुळे जास्त खोलवर जात नाहीत, असे पीक त्याच जमिनीत लावल्यास दोन्ही पिके चांगली येतात. कडधान्याच्या मुळांवरील गाठींमुळे त्या पिकाखालच्या जमिनीतील नायट्रोजनाचे प्रमाण वाढून नंतरचे त्याच शेतातील ज्वारीचे पीक चांगले येते. उत्तर भारतात बार्ली, गहू अगर भात व वाटाण्यानंतर ज्वारी पेरतात. मध्य व दक्षिण भारतात कापूस अगर कडधान्याच्या पिकाबरोबर ज्वारीच्या पिकाची फेरपालट करतात. बागायती ज्वारीची फेरपालट मिरची, तंबाखू, भुईमूग वगैरे पिकांबरोबर करतात.

मिश्रपीक

ज्वारीचे पीक मिश्रपीक म्हणून अगर स्वतंत्रपणे घेतात. उत्तर व मध्य भारतात ते तूर, जवस अगर करडईबरोबर आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यांच्या काही भागांत चवळी, तूर, उडीद, मूग, मटकी अगर कुळीथाबरोबर मिश्रपीक म्हणून घेतात. काही शेतकरी ज्वारीबरोबर गवार अगर अंबाडीचेही पीक घेतात. रबी ज्वारीत हरभऱ्याचे मिश्रपीक घेतात.

मशागत

या पिकाकरिता जमीन दर वर्षी नांगरीत नाहीत. तीन-चार वर्षांतून एकदा नांगरली तरी चालते. मे महिन्यात दोन-तीन वेळा १०–१२ सेंमी. खोलीपर्यंत जमीन कुळवाने मोकळी करतात.

हंगाम आणि पेरणी पद्धती

एकूण हंगाम तीन असतात. पावसाळी (खरीप), हिवाळी (रबी) व उन्हाळी. पावसाळी हंगामातील जाती जून-जुलैमध्ये व हिवाळी हंगामातील जाती सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पेरतात. खरीप व रबी पिके दाणे आणि वैरणीसाठी लावतात. उन्हाळी पिके ओल्या वैरणीसाठी लावतात. पीक लावण्याचे जिरायत (कोरडवाहू) व बागायत (ओलीताखालचे पीक) असे दोन प्रकार आहेत. जिरायत पिकाच्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.

स्थानिक रुढ पद्धत

जमिनीत पुरेशी ओल झाल्यावर पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे जमीन चांगली भिजून वाफसा आल्यावर पाभरीने बी पेरतात.

दुर्जल शेती पद्धत

यात पावसाचे पाणी शक्य तितके मुरवून नंतर जमिनीची मशागत करून पाभरीच्या दोन फणांत ४५ सेंमी. अंतर ठेवून बी पेरतात .

टोकण पद्धत

जमिनीत पुरेशी ओल होऊन वाफसा आला म्हणजे ४५x४५ सेंमी. अंतरावर सरळ ओळीत ५-६सेंमी. खोल (ओलीपर्यंत) भोके पाडून त्यांमध्ये प्रत्येकी ६–८ ज्वारीचे दाणे टाकून ओल्या मातीने ती भोके झाकून टाकतात. बी उगवल्यावर बी विरळणीच्या वेळी प्रत्येक टोकणीच्या जागी दोन-तीन जोमदार रोपे ठेवून बाकीची उपटतात. खरीप पिकात दोन ओळींमधील अंतर ३०–४५ सेंमी. आणि रबी (कोरडवाहू आणि बागायती) पिकांच्या बाबतीत ते ४५ सेंमी. ठेवतात. पेरणीसाठी निवडक बी वापरतात. त्यासाठी बी चाळून पाखडून घेतात. पिकात पुढे कवकीय (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळे होणारे) रोग उद्‌भवू नयेत म्हणून पेरण्यापूर्वी बियांना पारायुक्त कवकनाशक अथवा गंधक चोळून घेतात. त्याचप्रमाणे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारलेल्या प्रकारांचे बी वापरणे आवश्यक असते. भारतातील वेगवेगळ्या राज्यांसाठी तसेच वेगवेगळ्या जमिनींस व हवामानांस अनुकूल असे ज्वारीचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. धान्याच्या पिकासाठी हेक्टरी ९–१० किग्रॅ. आणि वैरणीच्या पिकासाठी ५०–६० किग्रॅ. बी पेरतात.

आंतर मशागत

पेरणीनंतर (अगर बी टोकल्यानंतर) सु. तीन आठवड्यांनी पिकाला कोळपणी देतात. निंदणी करून ओळीतील तण काढून घेतात. पुढे तर पंधरा दिवसांनी पिकाला कोळपणी देतात. पिकात तण वाढू देत नाहीत. कोळपणीमुळे जमीन भेगाळत नाही, पिकाच्या मुळांना हवेचा, वनस्पतिपोषक द्रव्यांचा व पाण्याचा पुरेसा पुरवठा होतो. एकूण ३–४ कोळपण्या व दोन-तीन खुरपण्या देतात. दुष्काळी अगर कमी पावसाच्या विभागात अकोला कोळप्यासारख्या कोळप्याने कोळपणी करतात.

खत

वार्षिक ७५ ते ८२ सेंमी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात ज्वारीच्या कोरडवाहू पिकाला हेक्टरी ६ टन आणि बागायती पिकाला १२ ते १८ टन शेणखत अगर कंपोस्ट पूर्व मशागतीच्या वेळी देतात. हेक्टरी ८० किग्रॅ. नायट्रोजन मिळेल असे कोणतेही रासायनिक खत आणि १९० किग्रॅ. सुपरफॉस्फेट पेरणीच्या वेळी देतात. निरनिराळ्या प्रयोगांवरून असे आढळून आले आहे की, हेक्टरी २० ते ४० किग्रॅ. पेक्षा जास्त नायट्रोजन आणि २०–३० किग्रॅ. पेक्षा फॉस्फोरिक अम्ल दिल्यास भारतातील स्थानिक प्रकारांच्या उत्पन्नात वाढीव खताच्या प्रमाणात वाढ होत नाही. मात्र संकरित (हायब्रीड) ज्वारीच्या प्रकारांना जास्त खत दिल्यास स्थानिक जातींच्या तुलनेने जास्त उत्पन्न येते. निरनिराळ्या राज्यांतील बागायत आणि कोरडवाहू तसेच स्थानिक आणि संकरित प्रकारांसाठी रासायनिक खतांच्या वेगवेगळ्या मात्रा प्रयोगान्ती ठरविण्यात आल्या आहेत. बागायती पिकाला कोरडवाहू पिकापेक्षा जास्त आणि स्थानिक प्रकारांपेक्षा संकरित प्रकारांना जास्त खतांची मात्रा ठरविण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी कृत्रिम खतांतील घटकांचे हेक्टरी प्रमाण खालील कोष्टका मध्ये दिल्याप्रमाणे शिफारस करण्यात आले आहे.

महाराष्ट्रासाठी ज्वारीच्या पिकाकरिता खतातील घटकांचे

हेक्टरी प्रमाण (किग्रॅ. मध्ये)

खतातील घटक बागायत ज्वारीचे पीक कोरडवाहू पीक
स्थानिक प्रकार संकरित प्रकार
नायट्रोजन ५० ७४ २५
फॉस्फॉरिक अम्ल २५ ४९ १२
पोटॅश ३७

कोरडवाहू पिकाला सर्व नायट्रोजन आणि फॉस्फोरिक अम्ल एकाच हप्त्यात पेरणीपूर्वी देतात. बागायती पिकाला नायट्रोजनाची निम्मी मात्रा आणि फॉस्फोरिक अम्ल आणि पोटॅश यांची पूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी आणि नायट्रोजनाची राहिलेली निम्मी मात्रा पेरणीनंतर ३०–४५ दिवसांनी (पीक ५०–६० सेंमी. उंच झाल्यावर) देतात. ज्या भागात पाऊस खात्रीचा असतो आणि जमिनीतील ओल ज्वारीच्या पिकाची गरज पुरी होईपर्यंत टिकेल अशी शाश्वती असते किंवा पिकाला खत दिल्यानंतर पाणी देण्याची सोय असते, अशा ठिकाणीच रासायनिकखते (वरखते) देणे श्रेयस्कर असते. अन्यथा अशा प्रकारची खते देत नाहीत.

पिकाची राखण

ज्वारीच्या दाण्यासाठी लावलेल्या पिकाचे पक्ष्यांपासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असते. पिकाच्या दाणे भरलेल्या कणसांवर चिवळ, भोरड्या, चिमण्या वगैरे जातींची पाखरे मोठ्या थव्याने सकाळी व संध्याकाळी उतरतात आणि कणसांतील दाणे टिपून खाऊन पिकाचे नुकसान करतात, म्हणून ती पिकावर उतरल्याबरोबर पिकातून हाकलून द्यावी लागतात.

ज्वारीवरील किडींचे व्यवस्थापन

ज्वारी पिकात मुख्यतः खोडमाशी, मावा, तुडतुडे या किडींचा व दाण्यावरील बुरशी यांचा प्रादुर्भाव होतो. किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीचा पातळीच्या खाली ठेवण्यासठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

जमिनीची मशागत

१) पुरेसा पाऊस झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर पेरणी केल्यास खोडमाशी व मिजमाशी पासून पीक  वाचवू शकतो.

२) शेतातील पिकाची धसकटे व काडीकचरा वेचून जाळून टाकला तर त्यामध्ये असलेल्या किडींच्या  कोशांचा नाश होतो.

३) उन्हाळ्यात पिक काढणीनंतर शेताची नांगरट केल्यानंतर जमिनीतील किडीच्या अवस्था मरतात किंवा नैसर्गिक शत्रूला (पक्षी) बळी पडतात.

४) पिकांची फेरपालट करावी.

तांत्रिक व्यवस्थापन

१) आकर्षक सापळ्यांचा वापर करावा.

२) प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.

जैविक किड नियंत्रण

१) ट्रायकोग्रामा चीलोनीस  या परोपजीवी कीटकाच्या अंडी पुंजाचा वापर करावा.

२) क्रायसोपरला कार्निया या परभक्षी कीटकाच्या अंडी पुंजाचा वापर करावा

खोडमाशी:

१) CSHC-७, CSH-८, CSH-१५R, M३५-१, स्वाती, मालदांडी या खोडमाशीला प्रतिकार करणाऱ्या  वाणाची पेरणी करावी.

२) पुरेसा पाऊस झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर पेरणी करावी.

३) पिकांची फेरपालट करावी उदा: कापूस, भूईमुग किंवा सूर्यफूल

४) इमिडाक्लोप्रीड ७० WS @ १ ग्राम/१किलो बियाणे किंवा क्लोरोपायरीफॉस २० EC किंवा मोनोक्रोटोफोस ३६ WSC @ ४ मिली/१ किलो बियाणे या कीटक नाशकाची बीजप्रक्रिया करावी.

५) पेरणीवेळी दाणेदार फोरेट १०G किंवा कार्बोफ्युरोन ३G एकरी १ किलो याप्रमाणात बियाण्या बरोबर टाकावे.

६) खोडमाशी मासळीच्या वासाने आकर्षित होतात. मासळी पाण्यात भिजवून सापळ्यामध्ये वापरावे, सापळ्यामध्ये एका डबीत ठेवलेल्या डायक्लोरोव्हस या किटकनाशकाच्या वासामुळे मरतात. आणि सापळ्याच्या खाली असलेल्या डबीत गोळा होतात.

७) किडग्रस्त झाडे नष्ट करावीत.

८) सायपरमेथ्रीन १० EC @ २० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

खोडकीड

१) जमिनीची खोल नांगरट करावी

२) तूर, चवळी ही पिके आंतरपीक म्हणून घ्यावीत.

३) ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.

४) CSH-16, CSH-18, CSV-10, CSV-15, CSV-17 या खोडकिडीला प्रतिकार करणाऱ्या वाणाची पेरणी    करावी.

५) नत्राचा आणि स्फुरदाचा नियंत्री हप्ता दयावा.

६) किडग्रस्त झाडे नष्ट करावीत.

७) शेतामध्ये एकरी ट्रायकोग्राम चीलोनीस या परोपजीवी किटकाचा ५०००० अंडीपुंज म्हणजेच ४ ट्रायको कार्डचा वापर करावा.

८) क्लोरोपायरीफॉस २०% EC @ २०-२५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

९) दाणेदार कार्बारील ४% एकरी ४ किलो याप्रमाणात पोंग्यात टाकावे.

मावा व तुडतुडे

१) ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.

२) क्रायसोपरला कार्निया या परभक्षी किटकाचे एकरी २०००० अंडीपुंजाचा वापर करावा

३) नर कीटकांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे लावावेत.

४) पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी ४ लावावेत.

५) नत्रयुक्त खतांचा जास्त प्रमाणात वापर करण्याचे टाळावे.

६) डायमिथोएट ३०% EC @ १५ मिली किंवा मिथिल डिमेटोन २५% EC @ १२ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मिजमाशी

१) मिजमाशी उपद्रवग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी एकाच वेळी पक्व होणाऱ्या वाणांची एकाच वेळी पेरणी    करावी.

२) पिकांची फेरपालट करावी उदा: कापूस, भूईमुग किंवा सूर्यफूल

३) किडग्रस्त झाडे नष्ट करावीत.

४) मेलेथीओंन ५% भुकटी क्विनोलफॉस १५% भुकटी ८ किलो/ एकर या प्रमाणात कणसांवर धुरळावी

५) आवश्यकतेनुसार दुसरी धुरळणी/फवारणी पहिल्या धुरळणी/फवारणी नंतर ५-१० दिवसांनी करावी.

६) मेलेथीओंन ५०% EC @ २५-३० मिली/एकर या प्रमाणात फवारणी करावी.

काढणी

ज्वारीचे पीक तयार व्हावयाला सु. पाच महिने लागतात. पीक काढणीलायक होण्याच्या आधी २०–२५ दिवस त्याच्या ताटांवरील खालची बुंध्याकडची दोन-चार पाने काढून घेतल्यामुळे पिकात हवा खेळती राहून अकार्यक्षम पानांमध्ये जाणारा अन्नरस वाचून त्याचा ताटाला उपयोग होऊन कणसात दाणे चांगले भरतात. दाणे चांगले पक्व झाले म्हणजे ज्वारीची ताटे कापून किंवा उपटून काढून घेतात. कापून वा उपटून काढलेली ताटे शेतातच ३–४ दिवस वाळत ठेवतात. नंतर पेंढ्या बांधून त्या खळ्यावर रचून ठेवतात.

मळणी

कणसे पूर्ण वाळल्यानंतर पेंढ्या खळ्यात पसरून ताटांवरची कणसे कापून घेऊन ती खळ्यात पसरून बैलांची पात धरून अगर त्यांच्यावरून बैलगाडी हाकून ती चोळवटून मळून त्यांच्यातले दाणे मोकळे करतात. खळ्यातल्या कणसांच्या थरावरून दगडी रूळ चालवूनही मळणीचे काम लवकर आणि सुलभतेने करून घेता येते. हा मळलेला माल वाऱ्याच्या अगर उफणणीच्या पंख्याच्या किंवा उफणणीच्या यंत्राच्या साहाय्याने उफणून दाणे वेगळे काढून साफ करून पोत्यात भरून साठवून ठेवतात. हल्ली संपूर्ण मळणीचे काम शक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने थोड्याच वेळात करता येते व अशा प्रकारच्या मळणी यंत्रांची उपयुक्तता शेतकऱ्यांना पटल्यामुळे या यंत्रांचा वापर वाढत्या प्रमाणावर होत आहे. मळणी व उफणणी ही दोन्ही कामे एकाच यंत्रात होतात. एका तासात ८ ते १२ क्विंटल ज्वारीची मळणी होते.

उत्पन्न

जमिनीचा दर्जा, पर्जन्यमान (अथवा पाणी पुरवठ्याची साधने), खताची मात्रा आणि मशागत यांवर ज्वारीचे उत्पन्न अवलंबून असते. त्यामुळे गावोगावी त्यात फरक आढळतो. १९६८–६९ ते १९७२–७३ या पाच वर्षांच्या काळात ज्वारीचे भारतातील सरासरी हेक्टरी उत्पन्न ४८१ किग्रॅ. होते. कोरडवाहू खरीप ज्वारीचे हेक्टरी उत्पन्न सर्वसाधारणपणे ४०० ते ५०० किग्रॅ. असते व दाण्याच्या तीन ते साडेतीन पट कडब्याचे उत्पन्न मिळते. कोरडवाहू रबी ज्वारीचे उत्पन्न हेक्टरी ६५० ते ७५० किग्रॅ. असते व दाण्याच्या दोन ते अडीच पट कडब्याचे उत्पन्न मिळते. बागायती ज्वारीचे हेक्टरी उत्पन्न १,२०० ते १,८०० किग्रॅ. असते. भारी जमिनीत ते हेक्टरी ४,००० किग्रॅ. पर्यंतही असते. ओल्या वैरणीचे उत्पन्न हलक्या जमिनीत हेक्टरी २० टन आणि भारी जमिनीत ३० ते ३५ टन मिळते.

उपयोग

नेहमीच्या आहाराचा एक प्रमुख भाग म्हणून ज्वारीचा भारतात, विशेषतः कमी पर्जन्यमानाच्या भागात, उपयोग करतात. शिवाय कणसे काढून घेतल्यावर राहिलेली वाळलेली ताटे (कडबा) यांचा जनावरांना वैरण म्हणूनही उपयोग होतो. दाण्याचे पीठ करून त्याच्या भाकरी करतात अथवा लाह्या, हुरडा व लापशी या स्वरूपांतही दाण्याचा वापर करतात. दाण्यापासून ‘माल्ट’ तयार करतात व त्याचा उपयोग लहान मुलांचे अन्न तयार करण्यासाठी अथवा बिअर तयार करण्यासाठी करतात. पावासाठी गव्हाच्या पिठात ज्वारीचे पीठ २५% पर्यंत मिसळून वापरता येते. तसेच दाण्यातील स्टार्चापासून किण्वनाने (आंबवून) एथिल अल्कोहॉल, सिटोन व ब्युटिल अल्कोहॉल तयार करतात. ज्वारीचा स्टार्च मक्याच्या स्टार्चाप्रमाणे असून त्याचा खाद्य पदार्थांच्या उद्योगांत आणि कापडधंद्यात खळीसाठी उपयोग होतो. कागद आणि पुठ्ठा तयार करण्याच्या उद्योगातही ज्वारीच्या स्टार्चाचा खळीसाठी वापर होतो. वॅक्सी सोर्घम नावाच्या ज्वारीच्या प्रकारापासून पाकिटे व तिकिटे चिकटविण्यासाठी आसंजक (चिकट पदार्थ) तयार करतात. मिलो आणि काफीर या ज्वारीच्या प्रकारांपासून साबुदाण्यासारखा पदार्थ आणि ज्वारीचे पोहे तयार करतात.

ज्वारीच्या काही प्रकारांच्या तुसांत लाल रंगद्रव्य असते आणि त्याचा चामड्याला रंग देण्यासाठी ईजिप्त आणि भारतात उपयोग करतात.

ज्वारीच्या ताटांपासून रासायनिक कृतीने तयार केलेला लगदा आणि लाकडापासून तयार केलेला लगदा यांच्या मिश्रणापासून लिहिण्याचा, वृत्तपत्राचा आणि वेष्टनाचा कागद तयार करतात.

ज्वारीच्या दाण्यांत ऱ्हायझोपस निग्रिकँस या कवकाचा एक प्रकार काही विशिष्ट परिस्थितीत वाढतो. अशा प्रकारची कवकामुळे दूषित झालेली ज्वारी खाण्यात आल्यास त्याचे अनिष्ट परिणाम म्हणजे तहान लागणे, बहुमूत्रता, भूक मंद होणे, थकवा येणे ही लक्षणे दिसून येतात. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी अशा रोगाची साथ पसरली होती.

वैरण

फुलावर आल्यावर ज्वारीची ताटे कापून ती ओली वैरण म्हणून अथवा मुरघास करून जनावरांना खाऊ घालतात. फुलावर येण्यापूर्वी ओली वैरण जनावरांना खाऊ घातल्यास त्यांतील धुरीन या सायनाइड वर्गातील विषारी पदार्थांमुळे विषबाधा होऊ शकते. लक्षणे सायनाइड विषबाधेची असतात व त्वरित उपचार न केल्यास जनावर मृत्युमुखी पडते. पीक फुलावर आल्यावर धुरीनाचे प्रमाण फारच अल्प असते. कडबा उन्हात वाळविल्याने अथवा ओल्या वैरणीचा मुरघास केल्याने राहिलेले अल्प प्रमाणातील धुरीन नाहीसे होते. बागायती पिकात कोरडवाहू पिकापेक्षा धुरिनाचे प्रमाण कमी असते; तसेच खोडामध्ये ते पानांपेक्षा कमी असते.

ज्वारी लागवडीसाठी यंत्र

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने रब्बी ज्वारीसाठी सुधारित पेरणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे एकाच वेळी आठ ते 10 सें.मी. खोलीवर बियाणे आणि 15 सें.मी. खोलीवर (बियाण्याच्या खाली साधारणपणे पाच सें.मी.) रासायनिक खते जमिनीमध्ये पेरता येतात.
यांत्रिक पेरणी यंत्राचा वापर करून पेरणी केल्यामुळे जमिनीचा वरचा थर (पाच सें.मी.) जरी कोरडा असला, तरी बियाणे खोलवर, ओलसर भागात पेरल्यामुळे उगवण होऊन उत्पादनाची शाश्‍वती मिळते.
-रासायनिक खते खोलवर ओलाव्यात, पिकाच्या मुळांजवळ दिल्यामुळे या अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होते.
-या पद्धतीने पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी रासणी करू नये.
-पेरणी यंत्राने जेव्हा ज्वारी पेरणी केली जाते, तेव्हा पेरणी यंत्रामागे जमिनीवर छोट्या उथळ सऱ्या तयार होतात. ऑक्‍टोबर महिन्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी या छोट्या छोट्या सऱ्यांमध्ये जमा होते. या पाण्याचा पिकाच्या वाढीस फायदा होतो. यासाठी खोलवर पेरणी नंतर रासणी करू नये.

यंत्राने पेरणी करताना

  • सुधारित पेरणी यंत्राद्वारे पेरणी करण्यापूर्वी व अधून मधून बियाणे योग्य खोलीवर (जमिनीच्या ओलसर भागात) आणि योग्य अंतरावर पडते आहे याची खात्री करून घ्यावी.
  • पेरतेवेळी बियाणे व रासायनिक खते वेगवेगळ्या खोलीवर पडत असल्याची खात्री करून घ्यावी.
  • यंत्राने पेरणी करताना बियाणे व खते यामध्ये पातळ मातीचा थर असावा.
  • जिरायती पद्धतीने रब्बी पिकांची पेरणी करताना खताची संपूर्ण मात्रा पेरतेवेळी द्यावी.
  • बागायती पिकांसाठी नत्रयुक्त खतांची मात्रा विभागून दोन वेळेस म्हणजेच पेरणीच्यावेळी निम्मे नत्र आणि उरलेले निम्मे नत्र पेरणी नंतर 30 दिवसांनी द्यावे. संपूर्ण – स्फुरदाची मात्रा पेरते वेळी द्यावी.

राज्यातील जमिनीमध्ये पालाश भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे पालाश वेगळ्या खतांमधून देण्याची गरज भासत नाही.
माती परीक्षणानुसार आणि पिकाच्या गरजेनुसार रासायनिक खतांचा वापर करावा.

रब्बी ज्वारी लागवडीचे नियोजन

1) रब्बी ज्वारी पेरणीसाठी सुधारित व शिफारस केलेल्या जातींची निवड करावी. हलक्‍या जमिनीसाठी सिलेक्‍शन-3, फुले अनुराधा, तसेच मध्यम जमिनीसाठी फुले माऊली, फुले सुचित्रा, मालदांडी 35-1, भारी जमिनीसाठी- फुले वसुधा, फुले यशोदा, सी एच व्ही. 22, पीकेव्ही क्रांती, परभणी मोती या जाती निवडाव्यात. हुरड्यासाठी फुले उत्तरा व लाह्यांसाठी फुले पंचमी या जातींची निवड करावी. भारी जमीन बागायतीसाठी फुले रेवती जातीची निवड करावी.
2) रब्बी ज्वारी पेरणीपूर्वी मूलस्थानी जलसंधारण करावे. त्यासाठी उतारानुसार 10×12 चौ.मी. आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. किंवा 2.70 मीटर अंतरावर उताराला आडवे सारा यंत्राने सारे पाडून दर 20 मीटरवर बळिराम नांगराच्या साहाय्याने दंड टाकावेत.
3) पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण करावी.
4) प्रतिहेक्‍टरी 10 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास चार ग्रॅम गंधक (300 मेश) बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर व 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी.
5) पेरणीसाठी 45 x 15 सें.मी. अंतर ठेवावी.
6) बागायती पिकासाठी भारी जमिनीस एकूण 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रतिहेक्‍टरी द्यावे. त्यापैकी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश पेरणीच्यावेळी पेरून द्यावे. उरलेले 50 किलो नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे. मध्यम जमिनीस 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश द्यावा. त्यापैकी अर्धा नत्र संपूर्ण स्फुरद व पालाश पेरताना द्यावा व उर्वरित 50 टक्के नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावा.
7) कोरडवाहू हलक्‍या जमिनीतील पिकासाठी हेक्‍टरी 25 किलो नत्र पेरणीच्यावेळी पेरून द्यावे.
8) ज्वारी पीक पेरणीसाठी दोन चाडी पाभरीचा वापर करावा.

ज्वारीवरील पोंगा मर 

लागवडीनंतर पहिल्या 21 दिवसांमध्ये पोंगे वाळण्याचे प्रमाण दिसून आल्यास ते खोडमाशीमुळे होत असते. खोडमाशी या किडीची अळी लहान रोपांच्या पोंग्यांत शिरून आतील भाग पोखरते, त्यामुळे शेंडा वाळतो, त्यास पोंगा मर म्हणतात. आपल्या शेतात या किडीचा प्रादुर्भाव असण्याची शक्‍यता असून, चार टक्के निंबोळी अर्क किंवा 2.8 टक्के डेल्टामेथ्रीन 100 मि.लि. 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

आपल्या भागामध्ये सातत्याने खोडमाशीचा प्रादुर्भाव होत असल्यास दरवर्षी खालील उपाययोजना कराव्यात

1) खोडमाशीच्या नियंत्रणासाठी धसकटे व सड इ. वेचून शेत स्वच्छ करावे.
2) पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास दहा ग्रॅम या प्रमाणात पाच टक्के कार्बोसल्फानची बीजप्रक्रिया करावी.
3) योग्य वेळी पेरणी करण्याकडे लक्ष द्यावे. सोलापूर भागासाठी ज्वारीच्या पेरणीचा कालावधी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्‍टोबर असा असावा, त्यापेक्षा लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढतो.
4) मेलेली रोपे काढून नष्ट करावीत.
5) पेरणीनंतर आठ दिवसांत चार टक्के निंबोळी अर्क किंवा 2.8 टक्के डेल्ट्रामेथ्रीन 100 मि.लि. 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
ज्वारीच्या पिकामध्ये लागवडीनंतर 21 दिवसांनंतर पोंगे वाळण्याचे प्रमाण अधिक दिसून येत असेल, तर तो खोडअळीचा प्रादुर्भाव असतो. खोडअळी पोंग्यातील कोवळी पाने खाऊन खोडात शिरते आणि वाढणारा शेंडा मारते. पीक मोठे झाल्यावर अनेक अळ्या ताटात दिसतात. कणसे मोडून पडतात.

100 total views, 0 views today