413709

तृणधान्यांसाठी गुणवत्ता महत्त्वाची

तृणधान्यांसाठी गुणवत्ता महत्त्वाची

कृषी उत्पन्न (वर्गवारी आणि पणन) कायदा

हा कायदा भारत सरकारच्या व्यापार आणि तपासणी संचालनालयाने ग्राहकांना विशिष्ट गुणवत्तेची कृषी उत्पादने मिळावीत म्हणून 1937 मध्ये स्थापन केला. या कायद्याने कृषी उत्पादनाची त्यांच्या प्रतीनुसार विशेष (वर्ग-1) चांगला (वर्ग-2) सुरखे (वर्ग-3) आणि सामान्य (वर्ग-4) या 4 विभागात वर्गवारी केली जाते. या कायद्यामध्ये अन्नपदार्थांना वापरण्यात येणाऱ्या परिवेष्टनाचे गुण सांगितलेले आहेत. जे अन्नपदार्थ या कायद्याने ठरवून दिलेल्या गुणवत्ता दर्शवितात. त्यांना या कायद्यातील तरतुदीप्रमाणे “एगमार्क’ देण्यासाठी प्रत्येक पदार्थाची वेगळी नियमावली केलेली आहे.

विनापरवानगी “एगमार्क’ या मानचिन्हाचा उपयोग करता येत नाही आणि वापर केल्यास या कायद्यान्वये गुन्हा आहे. एगमार्क असलेल्या अन्नपदर्थांबद्दल काही तक्रार असल्यास कृषी खरेदी- विक्री सल्लागार त्यांची दखल घेतात. हा कायदा जवळ जवळ 56 वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थांना लागू आहे. यामध्ये फळे, भाज्या, अंडी, मसाला, तेलबिया, डाळी, तृणधान्य, मटण आणि दुधाचे पदार्थ इत्यादींचा समावेश होतो. एगमार्क शीर्षक असणारा पदार्थ त्याच्या गुणवत्तेची ग्वाही देतो. त्यासाठी ग्राहकांनी असे शीर्षक असणारा पदार्थच विकत घेण्याचा प्रयत्न करावा. एगमार्क प्रमाणके हे आंतरराष्ट्रीय अन्न निगडित प्रमाणकांचा विचार करून ठरवण्यात आली आहेत.

तृणधान्याचे एगमार्कनुसार वर्गीकरण

तृणधान्यांची प्रतवारी करताना पाण्याचे प्रमाण, इतर घटक, इतर धान्याचे दाणे, दुसऱ्या वाणांच्या बिया, इजा झालेले दाणे, अपरिपक्व दाणे, किडीचा प्रादुर्भाव, सुरकुतलेले दाणे इत्यादी बाबींचा विचार केला जातो. तृणधान्यांची वर्गवारी केल्यामुळे त्यांना बाजारात किंमत मिळण्यास नक्कीच मदत होते, कारण ग्राहक हे मालाची पाहणी करूनच खरेदी करतात. दाणे वाळलेले, चवीस गोड, कठीण, स्वच्छ, एकसारख्या आकाराचे आणि रंगाचे असावेत. कोणताही रंग दिलेले नसावेत, बुरशी, किडी आणि इतर अपायकारक घटक विरहित असावेत. युरिक ऍसिड आणि ऍफ्लॉटोक्‍झीन यांच्या मात्रा अनुक्रमे 100 मि.ग्रॅ. आणि 30 मायक्रोग्रॅम प्रति किलोपेक्षा जास्त असू नयेत. शिवाय कीटकनाशकांच्या मात्रा या अन्नसुरक्षितता आणि मानके कायदा 2006 ने ठरवून दिल्यापेक्षा जास्त असू नयेत.

प्राण्यापासूनच्या घाणीच्या मात्रा या 0.10 टक्‍क्‍यापेक्षा जास्त असू नयेत आणि परके घटक (यामध्ये धातुयुक्त घटकांची मात्रा 0.25 टक्‍क्‍यापेक्षा जास्त आणि 0.10 टक्‍क्‍यापेक्षा जास्त प्राणिजन्य घटक असू नयेत) म्हणजे ज्वारीच्या दाण्याशिवाय इतर घटक यामध्ये असेंद्रिय घटक ज्यामध्ये धातू, धूळ, वाळू, दगड, माती आणि प्राण्यांची घाण यांचा समावेश होतो.
सेंद्रिय घटकामध्ये कोंडा, काडीकचरा, गवत आणि इतर अखाद्य दाणे इ. किंवा इतर धान्यांचे दाणे इत्यादी शिवाय यामध्ये इजा झालेले दाणे, मोड आलेले दाणे, बुरशीयुक्त दाणे, सुरकुतलेले आणि अपरिपक्व धान्य, किडींचा प्रादुर्भाव झालेले धान्य, विषारी वनस्पतीच्या (धोतरा, बिलाईत, केसरी डाळ इ.) यांचा समावेश होतो.

एगमार्कनुसार वर्गवारीसाठी आवश्‍यक बाबींचा उल्लेख तक्ता क्र. 2 मध्ये दर्शविण्यात आला आहे. एगमार्क वर्गवारीनुसार ग्रेडिंग करण्यासाठी आपल्या देशामध्ये 201 ग्रेडिंग युनिटची स्थापना करण्यात आली आणि 2006 मध्ये एक लाख टन ज्वारीची वर्गवारी ही उत्पादकांच्या मार्फत करण्यात आली. ज्वारीचे पॅकेजिंग हे वजने आणि मापे (पॅकेज्ड वस्तू) नियम 1977 प्रमाणे करण्यात येते. अन्नमहामंडळाची वर्गवारीदेखील एगमार्क आणि भेसळ प्रतिबंधक कायद्याने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणेच आहे.

कोडेक्‍स वर्गवारी

कोडेक्‍स एलिमेंटारियस मंडळाची वर्गवारी ही अन्न आणि कृषी संस्था आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्तपणे ठरवलेल्या निकषाप्रमाणे (सेक्‍शन 2 मध्ये नमूद केल्याप्रमाणे) मानवांना खाण्यासाठी ज्वारीचे वर्गीकरण करण्यात येते. ज्वारी खाण्यासाठी सुरक्षित असावी. तिला घाण वास असू नये आणि त्यामध्ये जिवंत किडीदेखील असू नयेत. तसेच प्राण्यांचे अवयव, मेलेले किडे किंवा घाण असू नये.

पाण्याचे जास्तीत जास्त प्रमाण 14.5 टक्के डिफेक्‍ट्‌स जास्तीत जास्त आठ टक्के यामध्ये सेंद्रिय आणि असेंद्रिय घटक, इजा झालेले दाणे, बियांव्यतिरिक्त घटक दोन टक्के,यापैकी असेंद्रिय घटक 0.5 टक्‍क्‍यापेक्षा जास्त असू नयेत. प्राण्यांपासूनचे घटक जास्तीत जास्त 0.1 टक्का दुसऱ्या वनस्पतीच्या विषारी बियांपासून मुक्त असावे. टॅनिनचे प्रमाण ज्वारीमध्ये 0.5 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असू नये आणि कोंडा विरहित ज्वारीमध्ये टॅनिनचे प्रमाण 0.3 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असू नये. जडधातूपासून मुक्त, पेस्टीसाईड आणि ऍफ्लोटॉक्‍झीनच्या मात्रा कोडेक्‍स एलिमेंटारियस मंडळाने ठरवून दिल्यापेक्षा जास्त असू नयेत. स्वच्छतेचे निकष हे CAC/RCP-1-1969 Rev. 2-1985) प्रमाणे असावेत.

141 total views, 0 views today