413709

भात लागवड

भात लागवड

भाताच्या सुधारित एसआरआय (सिस्टिम ऑफ राइस इंटेंसिफिकेशन) अर्थात सघन पद्धतीच्या लागवडीमुळे भात उत्पादकांना कमी खर्चात, कमी वेळेत तसेच मजुरी व बियाणे व अन्य निविष्ठांत बचत करून उत्पादन वाढवणे शक्‍य झाले आहे.

“एसआरआय’ पद्धतीने भात लागवडीचे तंत्र

भात लागवडीची एसआरआय (सघन) पद्धतीमुळे कमी खर्चात, कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळविता येणे शक्‍य आहे. या सुधारित लागवड तंत्रज्ञानातील बारकावे शेतकऱ्यांनी समजावून घेतल्यास पारंपरिक पद्धतीपेक्षा भाताचे चांगल्या दर्जाचे अधिक उत्पादन घेता येणे शक्‍य आहे.

एसआरआय (सघन) लागवड पद्धतीमुळे भाताची रोपे बळकट होतात. रोपांची मुळे लांब असल्याने कमी पाण्यातही तग धरतात. बळकट मुळांमुळे मातीमधील सिलिकॉन अधिक प्रमाणात शोषून घेतले जाते. या पद्धतीने पारंपरिक, तसेच सुधारित, संकरित जातींची लागवड करता येते.

अशी तयार करा रोपवाटिका

या पद्धतीने लागवड करण्यासाठी एकरी दोन ते तीन किलो चांगल्या प्रतीचे, 80 टक्के उगवणक्षमता असलेले शिफारशीत बियाणे निवडावे. रोपवाटिकेत बियाणे पेरणीपूर्वी तीन टक्के मिठाच्या द्रावणात दहा मिनिटे बियाणे बुडवावे. या द्रावणात तरंगणारे बियाणे काढून टाकावे, पाण्यात बुडलेले बियाणे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घ्यावे. त्यानंतर पाणी काढून 24 तास हे बियाणे सुती कापडामध्ये झाकून ठेवावे. या अंकुर फुटलेल्या बियाणांची मुळे दोन ते तीन मिलिमीटर लांबीची असतात.

रोपवाटिकेची गादीवाफा पद्धत

1) रोपवाटिकेच्या प्रत्येक 100 चौ. मीटर भागासाठी चार क्‍युबिक मीटर खतमाती मिश्रण मिसळावे. यासाठी साधारणपणे सात भाग मातीमध्ये दोन भाग चांगले वाळलेले शेणखत, गिरीपुष्प पाला, गांडूळखत आणि एक भाग भात तुसांची काळसर राख मिसळावी.
2) रोपवाटिकेत पेरणीसाठी खतमाती मिश्रणाचे दहा सें.मी उंचीचे आणि गरजेइतके लांब गादीवाफे तयार करावेत. प्रत्येक वाफ्यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा सोडावी. गादीवाफ्यावर अंकुरलेले बियाणे पेरावे. त्यावर भाताच्या पेंढ्याचे आच्छादन करावे, झारीने पाणी द्यावे. पेंढा दोन दिवसांनी काढावा. त्यानंतर 8 ते 12 दिवसांनी रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात. ही रोपे बारीक लाकडी पट्टी किंवा ऍल्युमिनिअम (एक मि.मी.जाडीचे) पत्र्याचा वापर करून रोपांना मातीसकट उचलून मुळांना धक्का न देता मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी न्यावीत.

मॅट पद्धतीची रोपवाटिका

या रोपवाटिकेसाठी समतल जमिनीची निवड करावी. त्यानंतर जमिनीवर केळीची पाने किंवा प्लॅस्टिक शीट पसरावे. ज्यामुळे रोपांची मुळे मातीत जाणार नाहीत, त्यानंतर या प्लॅस्टिक शीटवर लाकूड, विटा किंवा बांबूची चौकट तयार करावी. या चौकटीचा आकार एक मी. लांब, 0.3 मी. रुंद आणि चार सें.मी. उंच इतका ठेवावा, त्यामुळे ही चौकट समान भागामध्ये विभागलेली असेल (किंवा 12 ु 12 इंचांची छोटी चौकट वापरावी). याचा फायदा म्हणजे छोट्या भागांमुळे रोपांचा पुनर्लागवडीसाठी उपयोग होतो, रोपांच्या मुळांचे नुकसान होत नाही. त्यानंतर ही चौकट गादीवाफ्यासाठी तयार केलेल्या मातीच्या मिश्रणाने भरावी.
2) बीजप्रक्रिया केलेले बियाणे या मातीत पेरून त्यावर दोन ते तीन सें.मी. माती पसरावी. मग भाताच्या पेंढ्याने गादीवाफे झाकून ठेवावेत. त्यावर लगेच झारीने पाणी शिंपडावे. साधारणपणे पाच दिवसांपर्यंत रोपवाटिकेला दिवसातून दोन वेळा पाणी द्यावे. रोपवाटिका 8 ते 12 दिवसांची झाल्यानंतर ही रोपे बारीक लाकडी पट्टी किंवा ऍल्युमिनिअम (एक मि.मी. जाडीचे) पत्र्याचा वापर करून रोपांना मातीसकट उचलून मुळांना धक्का न देता मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी न्यावीत.पुनर्लागवडीची सूत्रे

एसआरआय पद्धतीने लागवड करण्यासाठी पारंपरिक पद्धतीप्रमाणेच शेतीची मशागत करावी. मशागतीनंतर मात्र शेतामध्ये समतलता काळजीपूर्वक ठेवावी, म्हणजे पाणी सगळीकडे सारख्या प्रमाणात लागू शकेल. शेतात प्रत्येकी तीन मीटर अंतरावर निचरा होण्यासाठी पाट काढून द्यावा. मार्करच्या साह्याने 25 x 25 सें.मी. अंतरावर उभ्या आणि आडव्या रेषा ओढाव्यात. प्रत्येक फुलीच्या मध्यावर रोप लागवडीचे नियोजन करावे. पिकाला रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर माती परीक्षणानुसार करणे आवश्‍यक आहे. एसआरआय पद्धतीमुळे खतांचा आणि पाण्याचा काटेकोरपणे वापर केला जातो, त्यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा या पद्धतीमध्ये रासायनिक खते आणि पाण्याच्या वापरात बचत होते.
रोपांची लवकर पुनर्लागवड
8 ते 12 दिवसांच्या दोन पानांच्या रोपांची पुनर्लागवड केल्यामुळे फुटवे फुटव्यांची संख्या वाढते. रोपे वरवर लावल्यास लगेच मुळे धरतात. अंगठा व तर्जनीचे बोट वापरून रोपे अलगद फुलीच्या मध्यावर लावावीत.

काळजीपूर्वक पुनर्लागवड

कुठलीही इजा न करता रोपे मातीसह उचलून घेऊन शेतामध्ये वर-वर लावावीत. रोप सशक्त व बळकट होऊन त्याला भरपूर मुळे फुटतात. रोपे जमिनीतील पोषणद्रव्ये नैसर्गिकरीत्या शोषून घेतात.
लागवडीचे अंतर

लागवड करताना रोपांचा चुडा न लावता एकाच रोपाची 25 x 25 सें.मी. या अंतराने लागवड करावी, त्यामुळे मुळांची आणि फुलोऱ्याची वाढ चांगली होते.
खुरपणी/ कोळपणी

आंतरमशागतीसाठी कोळपणी यंत्र वापरावे. दोन वेळा खुरपणी आवश्‍यक आहे.
पाणी व्यवस्थापन

जमिनीत ओल टिकून राहील, परंतु जमीन चिबड होणार नाही अशा पद्धतीने पिकाला पाणीपुरवठा करावा.
कंपोस्ट खताचा वापर

या पद्धतीने लागवड करताना हेक्‍टरी दहा टन कंपोस्ट खत लागवडीपूर्वी मिसळावे. सेंद्रिय खत उपलब्ध नसेल तर शिफारशीत प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवीत जाणे आवश्‍यक आहे.
एसआरआय पद्धतीने भात लागवड करताना 8 ते 12 दिवसांच्या रोपांची लागवड केली जाते. त्यामुळे मुळांचा चांगला विकास होऊन 30 ते 50 फुटवे मिळतात. पीक व्यवस्थापनाच्या या सहाही तंत्रांचा वापर केल्यास प्रत्येक रोपाला 50 ते 100 फुटवे येतात, फुटवे उत्पादनक्षम असतात. त्यांना जास्त लोंब्या येतात, लोंब्यांमध्ये अधिक व भरीव दाणे असतात.

तांदुळ खोडकिडीचे व्यवस्थापन

राइस स्टेम बोअररमुळे कणसांची संख्या व एकंदर उत्पादन घटते. ह्या किडीच्या सहा प्रमुख प्रजाती आहेत आणि त्या भातपिकाचे भरपूर नुकसान करतात. कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशात खोडकिड्याच्या चार जाती सापडतात – स्कर्पोफेगा इंसर्ट्यूला (पिवळ्या रंगाचा), चिलो सप्रेसालिस (अंगावर पट्ट्या असलेला), चिलो ऑरिसिलस (सोनेरी) आणि सेसामिया इन्फरन्स (गुलाबी) ह्या जाती वेगवेगळ्या अवस्थांतील भातपिकाचे अखंड नुकसान करीत असतात असे अडुथुराई येथील तामिळनाडू भात संशोधन संस्थेच्या एका संशोधनात्मक पाहणीत आढळले आहे.

खोडात राहणार्‍या अळ्या (लार्व्हा) खोड आतून पोखरून खातात. काहीवेळा अन्नवाहक नलिका तोडतात आणि ह्यामुळे पीक तुर्‍यावर येण्याआधीच ‘डेड हार्ट्स’ तयार होतात किंवा तुरे आल्यानंतर ‘व्हाइट हेड्स’ किंवा ‘व्हाइट इअर’ दिसून येतात.

पोषक घटक

हवामानाच्या विविध स्थितींमध्येही कीड टिकून राहण्यास अनेक घटक पोषक ठरतात, उदा. नायट्रोजनचे जास्त प्रमाण, मातीमध्ये सिलिकाचा अभाव, कमी तापमान व अधिक आर्द्रता असलेली थंड कोरडी हवा, पूर्वीच्या पिकाचे अवशेष शेतात शिल्लक असणे इ.

व्यवस्थापनात्मक उपाय

किडीच्या बंदोबस्तासाठीच्या एकात्मिक उपायांमध्ये संवर्धनात्मक (कल्चरल), जीवशास्त्रीय (बायोलॉजिकल) तसेच वर्तनात्मक (बिहेवियरल) दृष्टीने विचार करता येतो, तो असा –

  • (हवामानानुसार) लवकर तयार होणार्‍या व चांगल्या नांगरणीची गरज असलेल्या जातींची लागवड करणे
  • जमिनीचा pH  ७ पेक्षा जास्त असल्यास, दर एकरी 2.5 किलो स्यूडोमोना फ्लुरोसंस/ PGPR कंसोर्टियाचा, 25 किलो कडुनिंब-पेंड आणि 250 किलो चांगल्या कुजलेल्या खतासहित, वापर करणे. तसेच, अखेरच्या नांगरटीनंतर जमिनीचा pH ७ पेक्षा कमी असल्यास ट्रायकोडर्मा व्हिरिडचा वापर करणे.
  • बियाण्यावर प्रक्रिया करणे – प्रत्येकी एक किलो बियाण्यावर १० ग्रॅम ह्याप्रमाणात स्यूडोमोना फ्लुरोसंस/ पीजीपीआर कंसोर्टियाची प्रक्रिया करणे / एक हेक्टर जमिनीवर लावता येतील इतकी रोपे 2.5 किलो कंसोर्टिया पी फ्लुरोसंसमध्ये बुडवणे.
  • रोपांची पुर्न पेरणी करण्याआधी त्यांवरील खोडकिड्याची अंडी काढून टाकणे
  • पिकाच्या वाढीतील किडीला बळी पडण्याच्या नाजूक दिवसांमध्ये शेताची नीट पाहणी करून डेड हार्ट्स तसेच व्हाइट हेड्सचा छडा लावणे.
  • रोपांची पुर्न पेरणी  केल्यानंतर २८ दिवसांनी, एक आठवड्याच्या अंतराने तीन वेळा, अंडी खाणार्‍या ट्रायकोग्रामा जॅपोनिकमचा वापर करणे. तसेच ह्या  पुर्न पेरणी नंतर ३७, ४४ व ५१ दिवसांनी ट्रायकोग्रामा चिलोनिक्सचा वापर करणे.

49 total views, 0 views today